पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लिहित. स्वागतपर पद्यांकडं कुणी फारसं गांभीर्यानं पाहात नाही. पण सांगलीत जो नाट्यमहोत्सव झाला, त्यावेळचं श्रुतिमनोहर व अर्थवाहक स्वागतपर पद्य ऐकून, प्रा. श्री. म. माटे यानी आवर्जून कवीची चौकशी केली.
 ते कवि साधुदास होते हे सांगायला नकोच.
 दुर्दैवाने त्यांच्या अशा कविता, किंवा निरनिराळ्या मासिकांमधून प्रसिद्ध होणाऱ्या कवितांची, गणतीच कोणी ठेवली नाही. साधुदासांसारख्या प्रसिद्धी- पराङमुख कवीला तर अशा अगणित कवितांची मोजदादच नव्हती. सुप्रसिद्ध कवि रे. ना वा. टिळकानी एका कवितेत बहरलेल्या वेलीचे वर्णन करताना म्हटलयं की “किती आपुली, फुले अमलली, कुठे लटकली । पर्वा न तयाची वेलीला, सुंदरतेची ही लीला || "
 साधुदासांच्या काव्यरचनेला हे वर्णन तंतोतंत लागू पडते. त्यांची प्रतिभा बंद कुलुपात ठेवलेल्या कृपणाच्या संपत्तीसारखी नव्हती तर खूष होताच हातातील कडं भिरकवणाऱ्या खानदानी श्रीमंताच्या संपत्तीसारखी होती. कुणा संशोधकाने त्यांची अशी विखुरलेली काव्यरले एकत्र करुन पुस्तक काढलं, तर काव्यरसिक नक्कीच त्याला मनापासून दुवा देतील.
 कवी यशवंत तर त्याना गुरुस्थानीच मानत असत. काव्यशास्त्राचे पहिले- वहिले धडे त्यानी साधुदासांच्या हाताखालीच गिरवले.
 ऐतिहासिक कादंबरीलेखनाला, त्यानी आयुष्याच्या अत्तरार्धात सुरुवात केली. त्याचे थोडे-फार श्रेय सांगलीच्या राजेसाहेबांकडे जाते. तो गुणग्राहक राजा, साधुदासांच्या वाङमयनिर्मितीकडे, कौतुकाने पहाणारा रसिक होता. साधुदासांची इतिहासाची आवड आणि त्यांची चटकदार कथनशैली, राजेसाहेबाना परिचित होती. "आपण पूर्वजांच्या ऐतिहासिक गोष्टी लोकांपुढे अत्तम तऱ्हेने ठेवू शकाल” असे श्रीमंत म्हणाले. त्यामुळेच ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिण्याची स्फूर्ती झाली असे साधुदास कृतज्ञतापूर्वक म्हणत असत.

 ऐतिहासिक कादंबऱ्या जरी साधुदासानी अशीरा लिहिल्या असल्या तरी इतिहास हा त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय होता. कै. वासुदेवशास्त्री खरे, राजवाडे, पारसनीस प्रभृतींनी जी ऐतिहासिक साधने प्रसिद्ध केली होती त्याचा त्यानी कसून अभ्यास केला होता. सांगली संस्थानातील नोकरीमुळे, संपूर्ण पटवर्धन दप्तर, त्याना अभ्यासता आले. पण हा झाला अभ्यासाचा भाग. त्याना स्वतःला पेशवाई हा अत्यंत प्रेमाचा भाग वाटत असे. ते स्वतः प्रखर स्वदेशाभिमानी असल्याने


सांगली आणि सांगलीकर................................................................. .८३