पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साधुदासांच्या कादंबऱ्या १९३१ नंतर प्रकाशित झाल्या. (गद्यलेखन ते गो.गो. मुजुमदार या नावाने करत.) त्यानी गद्य लेखन पुष्कळ केले, चांगले केले. पण त्यांची खरी प्रतिभा जन्मजात कवीची होती. संस्कृत वाङमयाच्या अभ्यासामुळे, त्याना कालिदासाच्या रघुवंशाचे मोठे आकर्षण होते. त्या प्रेमापोटीच त्यानी रघुवंशावर आधारित अशी महाकाव्य रचना केली. वनविहार, रणविहार व गृहविहार अशा तीन विभागात ही रचना आहे. या महाकाव्यात त्यानी ४० हून अधिक अशा निरनिराळ्या वृत्तांचा अपयोग केला आहे. छंदशास्त्रावरील त्यांच्या विलक्षण प्रभुत्वाने इतिहासाचार्य राजवाडेसुध्दा प्रभावित झाले होते.
 पूजेला बसल्यावर एक तरी कविता वा श्लोक देवाला अर्पण करण्याचा. कित्येक वर्षे त्यांचा परिपाठ होता. पूजा झाली की इतर फुलांसारखे त्या कवितांचेपण निर्माल्य होई. त्यातून बचावलेल्या कवितांचा पुढे संग्रह निघाला. तोच पुढे 'निर्माल्य संग्रह' (भाग - १,२) म्हणून प्रसिध्द झाला. त्यानी पंडिती थाटाची रचना केली; तरीसुध्दा त्याना लोकगीते, पोवाडे, भोंडल्याची गाणी, झिम्म्याची गाणी, भारुडे, फुगडीचे अखाणे, आरत्या, अशा प्रकारांविषयी आस्था होती. त्यानी अशा प्रकारांचे संकलन करुन ती 'मराठी गाणी' म्हणून प्रकाशित केली.
 'शीघ्रकवित्व' हा साधुदासांच्या प्रतिभेचा विलोभनीय विशेष होता. वर्गात शिकवताना बघता बघता ते तुकारामासारखे अभंग रचत किंवा मोरोपंतासारख्या आर्या तोंडी सांगत. सांगली संस्थानासाठी एक 'संस्थानगीत', राजेसाहेबाना हवे होते: तेव्हा बँडच्या अवघड सुरावटीवर म्हणता येतील, अशी दहा गीते अवघ्या तासाभरात त्यानी लिहिली. त्यातलेच एक गीत राजेसाहेबानी पसंत केले. “हेरंबा अतिसदया, रक्षी पार्वति - तनया, 'पटवर्धन' वरद सुता, नृपतिस सांगलीच्या या" हे गीत जुन्या सांगलीकर मंडळीना सुपरिचित आहे. एकदा साधुदासांचे एक कविमित्र सुमंत, त्यांच्या घरी आले होते. मुक्काम संपल्यावर ते निघाले. स्टेशनवर त्याना पोचवण्यासाठी साधुदास गेले. गाडीला पंधरा-वीस मिनिटे बाकी होती. दोघा कवीनी ठरविले की परस्परांचा निरोप आपण काव्यात घेऊ. सुमंत कवीनी पंधरा मिनिटे घेतली तर साधुदासानी अवघी पाच ! दोघांच्याहि कविता अद्धृत करण्यासारख्या आहेत; पण विस्तारभयास्तव देता येत नाहीत. सुरुवातीच्या ओळी अशा होत्या.

सुमंत: “निरोप मजला दे रे मित्रा! दे निज गावा जाया ।
समान हृदये मिळून गेली, भिन्न जरी काया ॥"

...........................

साधुदासः "आला आधी अपरिचितापरी त्यासि ठाव दिधला ।
अपरिचिताचा परिचित होऊनि बद्धमूल झाला ||


सांगली आणि सांगलीकर.................................................................... ..८१