पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ते एवढे प्रभावित झाले होते की त्यांच्या मृत्युनंतर, त्याना त्यांचे चरित्र लिहिल्याशिवाय राहवेना. त्यामुळेच एक अप्रतिम, रसाळ चरित्र लिहिले गेले.
 १९०३-४ पर्यंत साधुदासांचा अभ्यास प्रामुख्याने संस्कृत वाङमयाचा होता. कोटणीस महाराजांमुळे त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी आली. या दहा-बारा वर्षांच्या स्वस्थतेच्या काळात त्यानी भरपूर वाचन केले. चिंतन केले. संतकाव्याचा फार बारकाईने अभ्यास केला. नित्य - नेम म्हणून ४० वर्षे त्यानी ज्ञानेश्वरीचे वाचन केले. या काळातील अभ्यासामुळे त्यांचे भाषाप्रभुत्व स्वयंसिद्ध झालेले होते.
 १९१५ साली सांगली हायस्कूलमध्ये एका मराठी भाषा शिक्षकाची जागा रिकामी झाली. सांगलीच्या राजेसाहेबांच्या अिच्छेमुळे साधुदासानी ही जागा पत्करली. ही नोकरी त्यानी १६ वर्षे केली. १९३१ ते १९४० या काळात त्यानी संस्थानातील स्टेट प्रेसचे सुपरिटेंडंट म्हणून काम केले.
 ६ एप्रिल १९४८ रोजी सांगलीतच कॅन्सरच्या दुखण्यात त्यांचे निधन झाले.

 शिक्षक म्हणून साधुदासांचा स्वतःचा काळ फार आनंदात गेला. मात्र विद्यार्थ्याना परीक्षेच्या दृष्टीने त्यांचे अध्यापन जरा कठिणच होते. कारण त्यांची एकूण वृत्ती शिक्षणशास्त्राच्या तंत्रात बसणारी नव्हती. नेमक्या वेळेला अभ्यासाचा तास सुरु करुन, नेमक्या वेळेत संपवणे, हा खाक्या त्याना जमण्यासारखा नव्हता. आजच्या जमान्यात तर परवडलेच नसते. पण संस्थानी काळ होता. राजेसाहेबांची मर्जी होती म्हणून निभावले. मात्र एरवी त्यांचा तास म्हणजे काव्यशास्त्रविनोदाची मोठी पखरण होती. मूळ विषयाच्या अनुषंगाने, अनेक चपखल अदाहरणे, आख्यायिका, यांची धमाल असे. त्यांच्या स्वतःच्या विनोदी वृत्तीमुळे त्यांचे तास रंजक होत. विद्यार्थ्याना ते बहुश्रुत करुन सोडत. स्नेहसंमेलन वा अन्य समारंभ प्रसंगी सुंदर पदे रचून विद्यार्थ्यांकडून ते परिश्रमपूर्वक स्वतः बसवून घेत. नाटकाच्या तालमी घेत; जागेची अडचण असे तेव्हा स्वतःच्या घरी तालमी घेत. त्यामुळे विद्यार्थीवर्गात ते अत्यंत लोकप्रिय होते. कधी कधी त्यांच्या तासाची वेळ झालेली असे आणि साधुदास गाढ निद्रेच्या आधीन झालेले असत. अशा वेळी त्याना अठवून आणावे लागे. पण एकदा का शिकवायला सुरुवात केली की मग ते पूर्णपणे त्यामध्ये रंगून जात. इंग्रजी कविता शिकवताना, कधी संस्कृत श्लोकांत त्यांचे भाषांतर करुन दाखवत तर कधी तुकारामाचा अभंग शिकवताना, त्या अभंगासारखेच पाच सहा अभंग, तत्क्षणी करुन दाखवत. विध्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे त्यांची अपजत काव्यप्रतिभा बहरून येई; दुथडी भरून वाहू लागे.


सांगली आणि सांगलीकर...................................................................... ८०