पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गरज नव्हती.
 मॅट्रिकनंतर पुढील शिक्षणासाठी साधुदासानी पुण्याला प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेतला. पण काय बिनसले कुणास ठाऊक? पहिल्या टर्मनंतर ते सांगलीला परतले ते कॉलेजला रामराम ठोकूनच !
 ही घटना १९०३ सालची. म्हणजे त्यावेळी ते जेमतेम १९-२० वर्षाचे होते. पुढच्याच वर्षी ते त्यांच्या दुधगावच्या चुलत चुलत्यास दत्तक गेले. पण दुधगावला त्यानी कधी फारसे वास्तव्य केले नाही.
 काही काळ नोकरी करावी, अशा हेतूने त्यानी सांगली संस्थानात, बेलिफाची नोकरी पत्करली. बेलिफाचे काम म्हणजे जप्त्या आणि वसुली. त्यात त्यांचे मन रमेना. एका प्रसंगात त्याना कुणीतरी लाच द्यायचा प्रयत्न केला. त्यामुळे वैतागून त्यानी नोकरीच सोडली. यानंतरची दहा-बारा वर्षे त्यांनी संपूर्णपणे स्वस्थतेत घालवली. कोणतीह नोकरी धंदा न करता ! घरची स्थिती चांगली असल्यानेच त्याना असा स्वस्थतेत काळ घालवणे शक्य झाले. या काळात त्यानी बराच वेळ बुद्धिबळे खेळण्यात घालवला. या खेळाचं त्याना अतोनात वेड लागलं. त्यापायीच त्यानी कॉलेजशिक्षणाकडं दुर्लक्ष केलं असं म्हणतात!
 या स्वस्थतेच्या काळात, सांगलीतील दोन मातब्बर व्यक्तींबरोबर त्यांचा संबंध आला. पहिले म्हणजे राजवैद्य आबासाहेब सांबारे. आबासाहेबांचं घर म्हणजे त्या काळातील सांगलीतील एक संस्थाच होती. वैद्य म्हणून त्यांची कीर्ती दिगंत होतीच पण त्याबरोबर संगीतात त्याना मोठी रुची होती, जाणकारी होती. बाळकृष्णबुवा, रहिमतखाँ, अल्लादियाखाँ अशा मोठमोठ्या गवयांचे त्यांच्याकडं गाणं होई. साधुदासांच्या शब्दात म्हणजे असं गाणं त्यानी ‘अमाप' ऐकलं. त्यामुळे त्यांचा स्वत:चा संगीताचा व्यासंग वाढला. संगीताच्या परिश्रमपूर्वक केलेल्या अभ्यासामुळेच, त्याना बाळकृष्णबुवा आणि रहिमतखाँ यांचेवरील मृत्युलेख लिहिताना, त्यांच्या गायनशैलीसंबंधी अधिकारवाणीने लिहिता आले.

 दुसरी महनीय विभूती म्हणजे सांगलीतील परोपकारी संत कै. हणमंतराव तथा तात्यासाहेब कोटणीस. ते स्वतः वकिलीचा व्यवसाय करता करता बाकीचा वेळ हरी-कीर्तनात घालवीत. ते स्वत: संतवाङ्मयाचे अभ्यासू होते. साधुदास त्यांच्या सान्निध्यात आल्यावर एवढे भारून गेले की त्यानी त्यांच्या संप्रदायाचा अनुग्रह घेतला. कोटणीस महाराजांबरोबर अनेकदा कीर्तनप्रसंगी साथ करण्यासाठी ते अभे राहात आणि संतांची पदे म्हणता म्हणता स्वरचित पदेही म्हणत. या साधुपुरुषामुळे


सांगली आणि सांगलीकर................................................................. ..७९