पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दोन विद्यार्थी सारख्याच नावांचे. या नामसादृश्यामुळे अनेक वेळा घोटाळे अडत. परीक्षेच्या वेळी दोन्ही नावांची गल्लत व्हायला नको म्हणून साधुदासानी मुजुमदार हे आडनावच कायम ठेवले. चुलत चुलत्याना दत्तक गेल्यानंतर, आणखी एक बदल घडून ‘गोपाळ धोंडो मुजुमदार' या ऐवजी ते 'गोपाळ गोविंद मुजुमदार' झाले.
 साधुदासांचे प्राथमिक, दुय्यम शिक्षण सांगलीतच झाले. सांगली हायस्कूलचे विद्यार्थी. तिथं श्रीपादशास्त्री देवधर हे प्रख्यात शिक्षक संस्कृत शिकवत. मॅट्रिकच्या परीक्षेत आपल्या विद्यार्थ्याना, जगन्नाथ शंकरशेट ही संस्कृत विषयाची शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी, त्यांची सतत धडपड असे. विद्यार्थ्यांकडून कसून तयारी करुन घेऊन असे अनेक विद्यार्थी ही प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती मिळवून गेले होते. साधुदास हे देवधरशास्त्रींच्या आवडत्या अशा विद्यार्थ्यांपैकी होते. शास्त्रीजीनी विशेष परिश्रम घेऊन, त्यावेळच्या इंग्रजी ५ वीच्या वर्गात असतानाच, साधुदासांकडून कालिदास, माघ इत्यादी प्रमुख कवींचे काव्यग्रंथ अभ्यासून घेतले होते. साधुदासांचा इतर विषयांचा अभ्यासहि चांगला असे. गणित हा तसा नावडता विषय असूनहि त्यांचा वर्गात नेहमी पहिला नंबर असे. घरी रोज संध्याकाळी, त्यांच्या मातोश्री, भक्तिविजय, पांडव - प्रताप आदी ग्रंथ वाचून घेत. त्यामुळे संतवाङमयाची पारायणे अनायासे बालपणातच घडली.
 आपल्यामध्ये काव्यगुण आहेत, याचा त्याना स्वतःला शोध, बालपणातच लागला होता. मिस्किल, थट्टेखोर स्वभाव, आणि सहजपणे शब्द कवितेत पेरता येतात याची त्याना स्वतः ला झालेली जाणीव, यामुळे ते येता जाता कवने करु लागले. त्यांच्या घरी जहांगीळमामा अशा विचित्र नावाचे एक भटजी येत असत. पुख्खा झोडण्यासाठी सदैव अत्सुक असलेल्या त्यांच्या बुभुक्षित वृत्तीची चेष्टा करताना वयाच्या ११व्या वर्षी त्यानी “ गरूड जसा गगनातुनि झेपावे अमृताचिया कुंभा, तैसा मामा धावे ऐकुनि झोडावयासि अदकुंभा” अशी आर्या रचली. एका तिरळ्या डोळ्याच्या नारबा नावाच्या माणसावर "नाय --- तू तिरवा, परंतु बरवा” अशा प्रकारच्या कविता रचत असत. यात थोडा चहाटळपणाचा भाग असला, तरी पुढे प्रसिद्ध पावलेल्या त्यांच्या शीघ्रकवित्वाची पेरणी, अशा कवितांमधूनच झाली असावी.

 मात्र साधुदासांना त्यांचे हे काव्यप्रेम, मॅट्रिकच्या परीक्षेच्या वेळी, चांगलेच भोवले. देवधरशास्त्रीनी शंकरशेठ शिष्यवृत्तीसाठी त्यांची चांगली तयारी करुन घेतली होती. ऐन परीक्षेच्या वेळी, इंग्रजीचे संस्कृत भाषांतर करण्याच्या प्रश्नाच्या वेळी, सरळ भाषांतर करायचे सोडून, साधुदास प्रहर्षिणी वृत्तामध्ये करत बसले. त्यामुळे त्यातच वेळ खर्ची पडून शिष्यवृत्ती हुकणार होती हे सांगायला कुणा ज्योतिषाची


सांगली आणि सांगलीकर..................................................................... ७८