पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
योगभ्रष्ट प्रतिभावान कवी
साधुदास



 ऐतिहासिक कादंबऱ्यांचं विलक्षण प्रेम असणारा, विशेषतः हरीभाऊंच्या ऐतिहासिक कादंबऱ्यानी भारावलेला एक रसिक एकदा माझ्या एका सांगलीकर मित्रास भेटला. म्हणाला 'अरे, आत्तांच मी तुमच्या सांगलीच्या साधुदासांची "पौर्णिमा" कादंबरी वाचली. काय विलक्षण सुंदर कादंबरी आहे रे? अगदी आमच्या हरीभाऊंच्या तोडीस तोड म्हणेनास. कोण होते हे साधुदास? आणखी कुठल्या कादंबऱ्या आहेत त्यांच्या?"
 माझा मित्र बुचकळ्यात पडला. कोण हे साधुदास ?
 सामान्य सांगलीकर बुचकळ्यात पडेल तर नवल नाही. पण वाङमयीन अभ्यासकालासुद्धा 'साधुदास' हे नाव तसं माहीत असणं कठीणच.
 खरंच कोण होते हे साधुदास ?
 साधुदास हे एक अपजत आणि अद्भुत काव्यप्रतिभा लाभलेले विलक्षण कवी होते. भूतपूर्व सांगली संस्थानचे राजकवी होते. ते प्रथम कवी होते. कादंबरीकार, चरित्रकार वगैरे वगैरे तदनंतर.

 अशा या साधुदासांचे मूळ नाव गोपाळ धोंडो पाटणकर. त्यांचा जन्म १७ फेब्रुवारी १८८४ चा. त्यांचे पूर्वज कोकणातून देशावर आले. सांगलीकर पटवर्धन घराण्याची पाटणकर मंडळी हे आप्तजन. त्यामुळे सांगली संस्थानात त्याना इनाम जमिनी मिळाल्या होत्या. खुद्द साधुदासांचे आणखी नशीब म्हणजे ते सांगलीतील घरंदाज, सुखवस्तू गृहस्थ कै. गणेश महादेव मोडक यांचे घरजावई बनले. त्यामुळे त्याना आर्थिक ददात अशी कधी पडली नाही. त्यांचे वडील, धोंडो गोपाळ पाटणकर, ब्रिटिश राज्यात सर्व्हेअर होते. त्यांच्या या मोजणी कामाच्या व्यवसायामुळे त्याना “मोजणीदार-मुजुमदार” असं नाव पडले. तेव्हा साधुदासानी मुजुमदार हेच नाव कायम ठेवलं. असं करायला त्यावेळी आणखी एक तात्कालिक कारण घडलं. त्यांच्या शाळेत 'गोपाळ धोंडो पाटणकर' या नावाचा आणखी एक विद्यार्थी होता.


सांगली आणि सांगलीकर.................................................................... ७७