पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दादांवरील एका खटल्यात उलटतपासणी घेताना सांगितले की, मी इंग्रजीत प्रश्न विचारेन आणि वसंतदादांकडे बोट दाखवत म्हणाल की यांना ते मराठीत सांगितले जावेत. तेव्हा वसंतदादा शांतपणे म्हणाले की, “कशाला उगाच कोर्टाचा वेळ घालवताय. असं करा की तुम्ही सरळ इंग्रजीत मला प्रश्न विचारा. मी मराठीत उत्तरे देईन. तुम्हाला नाही समजलं माझं मराठी तर इंग्रजीत भाषांतर करून घ्या. "
 सांगलीवर पटवर्धन राजघराण्याची सत्ता होती. तेव्हा संस्थापक थोरले चिंतामणराव, तात्यासाहेब आणि नंतर दुसरे चिंतामणराव असे तीन राजे होऊन गेले. स्वातंत्र्य मिळाल्यावर संस्थाने विलीन झाली राजेपद नष्ट झाले. लोकशाही रुजली आणि चमत्कार म्हणजे अशा लोकशाहीतच सांगलीला एक अनभिषिक्त राजा मिळाला! त्याचं नाव वसंतदादा पाटील.

 राजा प्रजेसाठी करतो तशी अनेक कल्याणकारी कामे या राजाने सांगलीकर जनतेसाठी केली. साखर कारखाना, मार्केट यार्ड याद्वारे शेतकऱ्यांना पारंपरिक दारिद्र्यातून, सावकारांच्या पंजातून सोडवले, औद्योगिक वसाहतीचे काम करून सांगलीच्या तरुणांना उद्योग क्षेत्रातली मोठमोठी स्वप्ने दाखवली, त्यांना उद्योगशील बनवले, इंजिनिअरींग कॉलेज काढून त्यांच्या तांत्रिक शिक्षणाची गावातच सोय केली, वैद्यकीय महाविद्यालय मिरजेत काढून डॉक्टर बनू पाहणाऱ्या सांगली - मिरजेतील बुद्धिवान तरुणांची सोय केली, सांस्कृतिक क्षेत्रात काही करू अशी इच्छा धरून असणाऱ्या कलावंतांच्या प्रतिभेला वाव मिळावा म्हणून 'सांग आकाशवाणी केंद्र' सुरू करण्यासाठी धडपड केली, गोरगरिबांना कमी पैशात वैद्यकीय सुविधा मिळाव्यात म्हणून मोठे सिव्हील हॉस्पिटल

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / ५५