पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अनेक पुढारी आजकाल जनता दरबार भरवतात. पण बऱ्याच वेळा तो मुद्दाम 'भरवलेला' असतो. पण वसंतदादांच्या घरात अशी माणसांची गर्दी, ते राज्य पातळीवर येऊन मोठी पदे, मंत्रीपदे मिळविण्याच्या कितीतरी आधीच्या काळापासूनची होती आणि तो 'दरबार' असा कधी नव्हताच. घोंगडी पसरून गाववाल्यांनी गाऱ्हाणी, आपली दुःखं सांगत बसावं तसा तो मेळावा असायचा. त्यात कृत्रिमतेचा लवलेशही नसायचा. अशा मोठ्या माणसाजवळ काय सांगावं आणि काय न सांगावं याचा विवेकही त्या भाबड्या माणसांकडे नसायचा. अगदी कारभारीण नांदीत नाही, मुलगा पैसं देत नाही अशा तक्रारीपासून, गावाला शाळा पाहिजे, धरण पाहिजे अशा मागण्यांपर्यंतचे काहीही त्यामध्ये असायचे.
 डॉ. सरोजिनी बाबर यांनी वसंतदादांच्या अशा गप्पागोष्टीचं फार मार्मिक वर्णन केलंय-
 एकदा सांगली साखर कारखान्यावर आमची जेवणखाण्याची गडबड चालू असताना खूप मजा आली. एकीकडे दादा जेवताहेत अन् दुसरीकडे लोकांचं एकेक काम 'बघू या बघू या' म्हणत ऐकून घेताहेत. अशी गंमत हं. लोकांची ही कामं कसली म्हणाल तर तुम्हा आम्हाला फालतू वाटावी अशी घरगुती !
 ‘दादा, चार दिवस झाली आमची म्हातारी रुसून गेलीया गा! कसंबी करून तिचा पत्त्या लागून द्या.'
 ‘आमचं दाल्लाबायकूंचं लई भांडान लागतं तवा ह्यात कोणची ग काढताय ती सांगा.'

‘दादा, आमी तुमच्या भाईर न्हाई. शाळा काडलीया तवा सरकारची

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / ५३