पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोजदाद करण्याच्या पलीकडची होती. अमर्याद होती.
 वसंतदादांनी आणि त्यांनी, दोघांनीही कायमचे एकमेकांना 'सेव्ह' करून ठेवलं होतं. वसंतदादांच्या या 'सेव्हींग' बँकेवरची खाती प्रचंड, अतिप्रचंड होती. वसंतदादांना कृष्णा तीरावर जेव्हा अखेरचा निरोप दिला गेला तेव्हा 'वसंतदादा बँकेच्या' या खात्यावरची शिल्लक ओसंडून वाहत होती! या खात्यावरच्या माणसांनी सांगलीचा सारा कृष्णातीर भरून गेला होता. त्यातल्या प्रत्येकाचा वसंतदादांशी काही ना काही संबंध आला होता. वसंतदादांनी त्या प्रत्येकासाठी काही तरी केलं होतं. त्यांच्या आपत्काळात त्यांना दिलासा दिला होता. संकटकाळात त्यांचे अश्रू पुसले होते. ती असंख्य माणसं एकमेकांना ओळखतही नव्हती. तरी एकमेकांबरोबर वसंतदादांविषयी बोलत होती. डोळ्यातील पाणी आवरत आवरत आपले अनुभव सांगत होती. दुसऱ्याचे ऐकून धन्य होत होती. ‘काय लाख मोलाचा माणूस होता' असं म्हणत उसासे सोडत होती. ती माणसं एकमेकांना अनोळखी असली तरी त्या सर्वांची 'ओळख' एकच होती. ती म्हणजे ‘वसंतदादा.' त्या सर्वांची 'वसंतदादा बँक' फुटली होती आणि बँकेची सारी चिल्लर कृष्णातीरावर जमली होती.

 असं लोकविलक्षण काय होतं दादांच्या व्यक्तिमत्वात? समाजातील अत्यंत सामान्य माणसाला त्यांच्याविषयी विलक्षण प्रेम होतं. ममत्व होतं. हा माणूस आपला आहे. माझं संकट, माझी अडचण, माझी समस्या हाच माणसू दूर करेल अशी त्यांची श्रद्धा होती आणि अशी एखाद्या दैवतावर जडावी अशी भक्ती या माणसावर जडावी असे खरोखरच वसंतदादांनी या माणसांसाठी केलेलं होतं. उगीच नाही कुणी कुणासाठी इतके अश्रू ढाळत..

५२ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील