पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘भेटायला’ आलेल्या मृत्यूला त्यानंतर तब्बल ४६ वर्षे त्यांनी तिष्ठत ठेवलं होतं!
 वसंतदादांविषयी आणखी काही :

 वसंतदादांचे हे काही परिपूर्ण चरित्र नाही तर त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडींचा एक धावता आढावा आहे. त्यांची कितीही चरित्रे लिहिली तरी, अजून पुष्कळ काही लिहायला हवं होतं ते राहिलंच अशी रुखरुख लिहिणाऱ्याला वाटावी आणि दादांविषयी अजून बरंच काही वाचायला मिळायला हवं होतं अशी हूरहूर वाचणाऱ्याला वाटावी असं एक विलक्षण व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये सामावलेलं होतं. लोकनेते हा शब्द आता अनेकांच्या बाबतीत अतिसढळपणे वापरला गेलाय. त्यामुळे तो फार बुळबुळीत झालाय. पण लोकनेते ही संज्ञा फारच थोड्या माणसांना अगदी खऱ्या अर्थाने फिट्ट बसते. शोभून दिसते. अशा काही दुर्मिळ नेत्यांपैकी वसंतदादा एक होते. वसंतदादा 'माणसांची बँक' असं कौतुकाने म्हटलं जायचं ते शब्दांमधून जाणवतं त्यापेक्षा अधिक खरं होतं! बँकेच्या खात्यांमध्ये 'फिक्स, सेव्हिंग, करंट' अशी अनेक खाती असतात तशी ती 'वसंतदादा' नामक बँकेतही होती. त्यांच्या 'फिक्स' अकौंटमध्ये अशी काही माणसं होती की, जी सदासर्वदा वसंतदादांची म्हणूनच प्रथमपासून अखेरपर्यंत वावरली. शरीराने आणि मनाने ती सदैव दादांपाशीच राहिली. चुकूनही कधी त्यांनी दादांशी प्रतारणा केली नाही की, गद्दारी केली. नाही. ती त्यांची आयुष्यभराची 'फिक्स' अकौंटची माणसं. काही माणसं करंट खात्याची. तशी ती संख्येने कमीच. कामासाठी, स्वार्थापोटी काही करंटी माणसं वसंतदादांजवळ आली. मतलब साधताच निघून गेली. मात्र ‘वसंतदादा' बँकेच्या सेव्हिंग खात्याची गंगाजळी होती, ती मात्र

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / ५१