पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 वसंतदादांची राजकीय कारकीर्द इथेच संपली!
 एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल चार वेळा वसंतदादांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले पण एखादा फलंदाज सणसणीत चौकार ठोकल्यावर जो आनंद स्वतः उपभोगतो, प्रेक्षकांना देतो तसा आनंद मात्र वसंतदादाना लुटायला मिळाला नाही हे मात्र त्यांचं दुर्दैव; चौकार मिळाला पण चार वेळा पळून चार धावा गोळा कराव्यात तसं झालं!

 वसंतदादांसारख्या लोकप्रिय नेत्याला असंच जाऊ देणे, , दिल्लीच्या हायकमांडला शोभणारं नव्हतं. परवडणारं नव्हतं. त्याचा चुकीचा संदेश जनमानसात जाण्याचा धोका होता. विरोधक त्याचा फायदा उठवतील अशीही भीती होती. म्हणून वसंतदादांचा काही सन्मान करणे दिल्लीच्या मंडळींना आवश्यक वाटलं असावं. त्यामुळेच वसंतदादांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नेमणूक केल्याची केंद्र सरकारतर्फे घोषणा करण्यात आली.

 तथापि काही काळ विचार करून राज्यपालपद वसंतदादांनी का स्वीकारले असेल याचे त्यांच्या चाहत्यांना आश्चर्य वाटणे स्वाभाविक होते. पण एक तर अविश्रांत परिश्रमांमुळे वसंतदादा थकले होते. मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. जुना सायटिकाचा आजार होताच. काठी घेतल्याशिवाय चालता येत नव्हतं. कोणत्याही पदाची त्यांना आता अपेक्षा नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मराठी बाण्याचा जो हिसका जाता जाता आपण दाखवलाय त्याची 'संभावना' पक्ष श्रेष्ठींकडून कशी होईल याची त्यांना कल्पना होती. यशवंतराव चव्हाणांची अखेरच्या दिवसातली मानहानी वसंतदादा विसरलेले नव्हते. सांगलीत राहणे त्यांना आवडले

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / ४९