पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मिताच्या बाजूने असल्याने स्वतंत्र मुंबईची मागणी करणारे गप्प बसले असावेत. पण दुर्दैवाने १९८४ मध्ये इंदिराजींची निर्घृण हत्या झाली. पाठोपाठ महिनाभरातच महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाणांचेही निधन झाले तेव्हापासून पुन्हा स्वतंत्र मुंबई राज्यासाठीच्या छुप्या हालचाली सुरू झाल्या असाव्यात.
 १९८५ मध्ये वसंतदादा मुख्यमंत्री असताना हा विषय ऐरणीवर आणण्याचे छुपे प्रयत्न पुन्हा सुरू झाले. इंदिराजीनंतर पंतप्रधान झालेले राजीव गांधी तसे नवखे असल्याने या मागण्या पुन्हा पुन्हा होऊ लागल्या तेव्हा मात्र वसंतदादा मनोमन खवळले असावेत. मुंबईवर परप्रांतियांचे लोंढे कसे आक्रमण करीत आहेत ते तर वसंतदादा अनुभवतच होते. म्हणून आता एकदा आक्रमक पवित्रा घ्यायचा ठरविल्यावर त्यांनी जाहीरपणे सुनावले, ‘महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत मात्र महाराष्ट्र नाही.'

 वसंतदादांच्या या स्पष्टोक्तीने दिल्ली हादरली. महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच असे बोलतोय म्हटल्यावर त्यातून 'कोणता संदेश' जातोय हे न कळण्याइतके दिल्लीतील काही काँग्रेसजन काही दुधखुळे नव्हते. आपल्या बोलण्याचा परिणाम काय होणार हे वसंतदादाही जाणून होते. कदाचित् उद्रेकापोटी असेल पण आपला 'मराठी बाणा' वसंतदादांनी दाखवला. म्हणून महाराष्ट्राचे अभिमानी वसंतदादांवर बेहद्द खूश झाले. आपल्याविरुद्ध पक्षातून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे हे पाहून वसंतदादांनी आपणहून २ जून १९८५ रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री झाल्यापासून अवघ्या तीन महिन्याच्या आधीच ते पायउतार झाले.

४८ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील