पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाषावार प्रांतरचना झाली तेव्हाच खरं तर मराठी जनतेला स्वतंत्र राज्य मिळायला हवं होतं. पण तेव्हापासून दिल्लीतील काँग्रेस हायकमांडचा दूषित दृष्टिकोन वसंतदादांच्या लक्षात येऊ लागला होता. काही उच्चपदस्थांना मुंबईतील आपल्या औद्योगिक हितसंबंधांना बाधा येऊ नये म्हणून मुंबई शक्यतो महाराष्ट्राला न देता, दिल्लीसारखं मुंबईचं एक वेगळं केंद्रशासित राज्य बनावं असं वाटत होतं. ते जमत नव्हतं म्हणून मराठी लोकांना स्वतंत्र राज्य न देता, गुजरातबरोबर महाराष्ट्राची मोट आवळून द्वैभाषिक राज्य राबवण्याचा एक पर्याय राबवला गेला. त्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे एक ऐतिहासिक आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने छेडले गेले.

 एस. एम. जोशी, श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे आदी अथी- रथीनी अतिशय हिरीरीने ते आंदोलन लढवून मराठी जनतेला मोठा आधार दिला. अनेक मराठी तरुणांचे या आंदोलनात प्राण गेले. यशवंतराव व वसंतदादा यांना या गोष्टी मनापासून पटत नसतीलही पण पक्षशिस्त म्हणून त्यांना गप्प बसावे लागले असेल. मात्र मराठी जनतेच्या प्रखर विरोधामुळे महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षच नामशेष होण्याचा धोका लागला तेव्हा यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे आदी अनेक नेत्यांनी पं. जवाहरलाल नेहरूंना स्वतंत्र मराठी भाषिकांच्या स्वतंत्र राज्याची आवश्यकता पटवून दिली. या कामासाठी इंदिरा गांधींच्या मध्यस्थीचा मोठा अनुकूल परिणाम झाल्याचेही त्याकाळी बोलले जात होते. काही का असेना पण १९६० अखेर महाराष्ट्राला वेगळे राज्य मिळाले. तरीसुद्धा मधूनमधून मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढण्याचा नारा पुन्हा पुन्हा संबंधितांकडून लावला जात होता. इंदिरा गांधींची स्वतःचीच सहानुभूती

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / ४७