पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परवानगी दिली. हा एक ऐतिहासिक निर्णय होता. त्यापूर्वी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, लायक आणि गुणी विद्यार्थ्यांना परप्रांतात जाऊन भारी फी भरून मेडिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घ्यावे लागे. त्यांची आता मोठी सोय झाली. या निर्णयामुळे महाराष्ट्रात ताबडतोब दोन वैद्यकीय महाविद्यालये, ५५ अभियांत्रिकी विद्यालये तर जवळजवळ ३०० औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू झाल्या. वसंतदादांच्या या धाडशी निर्णयावर खूप टीका झाली. पण या निर्णयाचे महत्त्व नंतर सर्वांना पटले. आज ग्रामीण भागातूनही डॉक्टर्स, इंजिनिअर्स होऊ लागले आहेत ते वसंतदादांच्याच द्रष्टेपणामुळेच !
 या दोन वर्षांच्या कमी काळात केलेल्या चांगल्या कामांची पावती १९८५ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वसंतदादांना म्हणजे काँग्रेस पक्षाला मिळाली. काँग्रेस पक्षाला विधानसभेत १६१ जागा मिळत निर्विवाद बहुमत मिळाले आणि प्रथमच फारशी खळखळ न होता वसंतदादांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली.
 आणि १० मार्च १९८५ रोजी वसंतदादा चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.
 पण पुन्हा येरे माझ्या मागल्या असाच प्रकार झाला! चौथ्यावेळेलाही वसंतदादा संपूर्ण कालावधी मुख्यमंत्रीपद उपभोगण्याच्या दृष्टीने कमनशिबी ठरले. मात्र यावेळी त्यांच्या राजीनाम्यात बापुडवाणेपणा नव्हता. स्वाभिमान होता. त्यासाठी थोडी पार्श्वभूमी विशद करणे आवश्यक आहे.

 जसजसा वसंतदादांचा मुंबईशी संपर्क वाढला. १९६० च्या दशकात पक्षाने राज्यव्यापी जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यास सुरुवात केली, तेव्हापासून मुंबईच्या अस्तित्वाविषयी ते मनोमन व्यथित होत गेले.

४६ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील