पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मतदारसंघातून त्यावेळी लोकसभेची निवडणूक लढविली आणि अर्थात प्रचंड बहुमताने जिंकलीही. इंदिराजींनी त्यांना दिल्लीतच इंदिरा काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून ठेवून घेतले. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश व काश्मीर या राज्यातील इंदिरा काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्याची जबाबदारी वसंतदादांवर सोपवण्यात आली. त्यांचे त्यावेळी दोन वर्षे दिल्लीतच वास्तव्य होते. त्यांचे तेथील '२४ वेलिंग्टन क्रिसेंट' हे निवासस्थान म्हणजे दिल्लीतील लोकांचे आकर्षण होते.
 वसंतदादांच्या घरातील माणसांचा अखंड राबता बघून, दिल्लीकरांना कौतुक वाटायचे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या सर्व मराठी मंडळींचे ते एक हक्काचे आश्रयस्थान बनले होते. त्यांच्या एकूण कामाचा आवाका बघून इंदिराजींचे त्यांच्याविषयीचे मत आणखी अनुकूल झाले. विशेषतः दिल्लीच्या बोट क्लबवर वसंतदादांनी शेतकऱ्यांचा प्रचंड मेळावा यशस्वी करून दाखवला. त्यामुळे इंदिराजी अगदी खूश होऊन गेल्या. पूर्वी शंकरराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळातून वसंतदादांना वगळण्याची जी चूक घडली होती, त्याला अंशतः त्याच जबाबदार होत्या. त्या चुकीचे परिमार्जन करण्याचे त्यांनी ठरवले असावे.
 राजकारण किती विचित्र असते याचा पुन्हा एकदा वसंतदादांना अनुभव आला. मात्र या खेपेला सुखद अनुभव आला.

 महाराष्ट्र राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याची संधी वसंतदादांना मिळाली. इंदिराजींनी तत्कालिन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या जागी वसंतदादांची नियुक्ती केली. २ फेब्रुवारी १९८३ ला तिसऱ्यांदा वसंतदादांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

४४ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील