पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सापत्न वागणूक! त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि यशवंतराव चव्हाणांमध्ये वितुष्ट आले. हे नवे मंत्रिमंडळ यशवंतराव चव्हाणांच्या आशीर्वादाने अधिकारारूढ झाले आहे असे कळल्यावर वसंतदादा हतबल झाले.
 स्वातंत्र्यपूर्वकाळापासून जवळजवळ चाळीस वर्षांची मैत्री अचानक तुटल्याचे दुःख वसंतदादांना फार झाले. स्वातंत्र्याच्या आंदोलनात दोघेही खांद्याला खांदा लावून लढले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात दोघेही खांद्याला खांदा लावून लढले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात पं. नेहरूंच्या इच्छेप्रमाणे लोकेच्छा डावलून महाराष्ट्र-गुजरातचे द्वैभाषिक चव्हाणांनी राबवले, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला विरोध केला म्हणून यशवंतराव अतिशय अप्रिय झाले होते. महाराष्ट्रात जातील तेथे त्यांचे स्वागत काळ्या निशाणांनी आणि धिक्कारांच्या घोषणांनी होत होते. एकही जाहीर सभा घेण्याची आणि यशस्वी करून दाखवण्याची संधी त्यांना मिळत नव्हती. अतिशय वाईट अशी यशवंतरावांची कोंडी महाराष्ट्रात झाली होती. अशा कठीण प्रसंगात वसंतदादांनीच त्यांची पाठराखण केली होती. सर्व विरोधी पक्षांचे आव्हान स्वीकारून, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलन काळात स्वतःच्या हिंमतीवर वसंतदादांनी यशवंतरावांची जाहीर सभा सांगलीच्या स्टेशन चौकात यशस्वी करून दाखवली होती. यशवंतरावांना त्यामुळेच थोडा दिलासा मिळाला होता.

 यशवंतराव महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यांनी नवमहाराष्ट्राची नवी नवी स्वप्ने बघितली तेव्हा त्यांचे प्रत्येक स्वप्न वसंतदादांनी यशस्वी करून दाखवले होते. वसंतदादांच्या कर्तृत्वाचा

४२ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील