पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माझ्या लाडक्या काँग्रेस पक्षाची फरफट मला बघवत नव्हती. स्वतःच्या घरालाच आग लागल्यावर गप्प बसणे मला अजिबात परवडणारे नव्हते. म्हणून मी आपणहून पुन्हा राजकारणात आलो. "
 वसंतदादांच्या पुनरागमनाने, निराशेने झाकोळलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री म्हणून वसंतदादांना फार काही करून दाखवायला फारसा वावच मिळाला नाही. कारण अवघ्या दहा महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या. त्यातच सरकारी कर्मचाऱ्यांनीही संप पुकारला होता.
 काँग्रेस पक्षातली दुही संपत नव्हती. त्याचा परिणाम स्वाभाविकपणे विधानसभेच्या निवडणुकींवर झाला. कुठल्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. तथापि दुभंगलेल्या दोन्ही काँग्रेस पक्षांनी जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे ठरवले. वसंतदादांची नेतेपदी निवड झाली. ६ मार्च १९७८ रोजी वसंतदादा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले.
 पण पुन्हा एकदा राजकारणातील संधिसाधुपणाचा, विश्वासघाताचा फटका वसंतदादांना मंत्रिमंडळ स्थापनेनंतर अवघ्या चार महिन्यातच बसला!

 शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, दत्ता मेघे आदी काँग्रेसच्याच नेत्यांनी वसंतदादांच्या मंत्रिमंडळातून राजीनामे दिले. जनता पक्ष या विरोधी पक्षाबरोबर आघाडी केली आणि वसंतदादांचे मंत्रिमंडळ अल्पमतात आले. शरद पवारांचे मंत्रिमंडळ सत्तेवर आले. वसंतदादांसाठी हा एक धक्का होता, पण त्याहून मोठा धक्का म्हणजे यशवंतरावांनी दिलेली

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / ४१