पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छेडले होते. त्यांनी या परिस्थितीचा फायदा उठवू नये म्हणून इंदिरा गांर्धीनी राष्ट्रपतींकरवी देशात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी पुकारली. विरोधी पक्षांच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटकेत ठेवण्यात आले. पंधरा महिने त्या सर्वांना अटकेत ठेवणाऱ्या इंदिराजींना काय वाटले कुणास ठाऊक? एके दिवशी त्यांनी हुकूम सोडून अचानक आणीबाणी उठवून लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या, पण त्यांचा अंदाज सपशेल चुकला. निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पूर्ण फज्जा उडाला. स्वतः इंदिरा गांधी पराभूत झाल्या.
 महाराष्ट्रातील अनेक जागा काँग्रेसने गमावल्या. केंद्रातली सत्ता गेली. आता महाराष्ट्रात काँग्रेस जगवायची असेल तर लोकप्रिय नेत्याकडे महाराष्ट्र राज्याची सूत्रे सोपवावीत असा निर्णय बदललेल्या परिस्थितीत घेतला. असा लोकमान्य नेता कोण? तर त्याचे उत्तर होते वसंतदादा पाटील! आता केंद्र सरकारमध्ये पराभूत इंदिराजी जाऊन त्यांच्या जागी जयप्रकाशजींच्या जनता पक्षाचे मोरारजी देसाई पंतप्रधानपदी होते. आपल्या काँग्रेस पक्षाला आगामी काळात महाराष्ट्रात जगवायचे असेल तर वसंतदादांशिवाय पर्याय नाही असा दिल्लीच्या काँग्रेस नेत्यांचा निर्णय झाला आणि १७ एप्रिल १९७७ ला अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर प्रथमच वसंतदादा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनले.

 सांगली परिसरात आणि विशेषतः पद्माळे गावात तर आनंदोत्सव साजरा झाला. सांगलीच्या सत्काराला उत्तर देताना वसंतदादा म्हणाले, "माझी राजकीय निवृत्ती तुम्हा लोकाना मान्य नव्हती. ती मी मागे घ्यावी म्हणून तुमचा सातत्याने आग्रह होता. आता तुम्ही जिंकला आहात.

४० / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील