पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 वसंतदादा आणि राजकारण संन्यास म्हटल्यावर मोठ्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यानी निर्णय मागे घ्यावा म्हणून लोकांनी स्वयंस्फूर्तीने मोर्चे काढले, निदर्शने केली. वसंतदादांनी आपल्या चाहत्यांना समजावलं आणि एका अर्थी स्वतःलाही समजावलं. अंतर्मुख होऊन त्यांनी विचार केला. आजवर मी एवढं विधायक काम केलं ते काही सत्तेच्या खुर्चीवर बसून केलं का? नाही, लोक माझा शब्द पाळतात. माझ्या प्रत्येक कामात साथ देतात ते काय माझ्या हातात सत्ता होती म्हणून? मग आता सत्ता गेली म्हणून का वाटून घ्यावं ?
 गंमत म्हणजे राजकारण-संन्यास घ्यायला निघालेल्या वसंतदादांना नियतीने एकदा नाही तर चक्क चार वेळा मुख्यमंत्री केले. पण त्यापूर्वी अनेक घटना घडल्या.<br  देशाच्या राजकारणात मोठे बदल घडत होते. १९७१ ते बांगलादेश युद्धाच्या वेळी इंदिरा गांधींनी जी विलक्षण धडाडी दाखविली, आपल्या मुत्सद्देगिरीने बलाढ्य अमेरिकेला नमवले त्यांची कधी राजकीय घसरण होईल असे वाटले नव्हते, पण झाली खरी.

 इंदिरा गांधी १९७१ मध्ये रायबरेली मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या होत्या. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब केल्याची तक्रार करून त्यांचे प्रतिस्पर्धी राजनारायण यांनी त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता. १९७५ च्या १२ जूनला अलाहाबाद हायकोर्टाने त्यांची निवडणूक बेकायदा ठरवली आणि इंदिराजींना ६ वर्षे निवडणूक लढवण्यास मनाई केली. त्यामुळे देशभर खळबळ माजली. त्याचवेळी लोकनेते जयप्रकाश नारायण यांनी बिहारमध्ये काँग्रेसविरुद्ध मोठे आंदोलन

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / ३९