पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वसंतराव नाईक आपल्या नव्या मंत्रिमंडळाची यादी घेऊन इंदिराजींकडे दिल्लीला गेले. तेव्हा त्या यादीत बघून म्हणाल्या, “यादी अपुरी आहे. " नाईकसाहेब गोंधळून बघू लागले. तेव्हा त्या हसल्या आणि त्यांनी वसंतदादांचे नाव मंत्रिमंडळाच्या यादीत घातले.

 मंत्रीपदाचा वसंतदादांचा हा पहिलाच अनुभव होता. वास्तविक सत्तेपासून दूर राहणेच वसंतदादांना आवडत होते. सत्तास्थानी गेल्यावर अनेक अडचणी येतात. मनासारखे काम करता येत नाही. अनेक मर्यादा पडतात आणि या साऱ्याचाच कटू अनुभव वसंतदादांना अवघ्या तीन- चार वर्षातच आला. पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी आपल्या खात्याच्या कामाची चांगल्या प्रकारे, उत्साहात सुरुवातही केली होती. पाण्याचे उत्तम नियोजन, ऊस व इतर अन्नधान्य उत्पादन वाढावे म्हणून ते प्रयत्नशील राहिले. खुजगाव, काळम्मावाडी धरण योजना यशस्वी करण्याच्या दृष्टीने ते प्रयत्नशील राहिले. पण ज्या नियतीने त्यांना अनपेक्षितपणे मंत्रिपदावर बसवले त्याच नियतीने अचानक मंत्रीपदावरून दूरही केले! शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक यांच्या नंतर नवे मुख्यमंत्री झाले तेव्हा अचानक त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातून वसंतदादांना वगळले. वसंतदादांसारख्या अत्यंत लोकप्रिय नेत्याला अशी अपमानास्पद वागणूक दिली गेल्याने सर्वत्र संतापाची लाटच उसळली. वसंतदादा वरकरणी शांत राहिले होते. पण त्यांच्या मानी मनाला ही गोष्ट . खूप लागली. काही महिने शांतपणे व्यतीत केल्यावर, एक प्रकारच्या उद्रेकापोटी आपल्या ६० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने घोषणा केली की, 'मी राजकारण संन्यास घेत आहे.'

३८ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील