पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोठे आंदोलन काँग्रेस विरोधात उभे ठाकलेले असताना आणि अन्यत्र काँग्रेसची पडझड होत असतानाही वसंतदादा पुन्हा आमदार म्हणून विधानसभेवर सांगली मतदारसंघातून निवडले गेले आणि याचीच पुनरावृत्ती पुढील सर्व निवडणुकांमधून होत राहिली. हे झाले वैयक्तिक पातळीवर.
 देशात काही घडले, बिघडले तरी सांगली जिल्ह्यात काँग्रेसची एकजूट वसंतदादांच्या नेतृत्वामुळेच केवळ अभेद्य राहिली होती आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींनाही या वस्तुस्थितीची जाण होती. त्यामुळेच वसंतदादांचा त्यांनी एक मोठा सन्मान केला. २४ मार्च १९६६ रोजी त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकी संपूर्ण राज्यभर प्रचाराचे दौरे काढून, वसंतदादांनी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले.

 दरम्यानच्या काळात १९६४ मध्ये पं. जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. ते असे तोपर्यंत काँग्रेस पक्ष अभंग होता. त्यांच्यानंतर अल्पकाळ लालबहाद्दूर शास्त्री पंतप्रधान होते. त्यानंतर नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. काँग्रेस पक्षात आपली हयात घालवणाऱ्या मोरारजी देसाई, जगजीवनराम आदी नेत्यांना ही गोष्ट मानवणारी नव्हती. त्यामुळे इंदिरा गांधींबरोबर या जुन्या मंडळींचे एकसारखे खटके उडू लागले. त्याचे पर्यवसान काँग्रेस पक्ष दुभंगण्यात झाले. १९६९ पासून काँग्रेस पक्षातील फाटाफुटी वाढत चालल्या. गटबाजीचे राजकारण सुरू झाले. अशा अवघड काळातही महाराष्ट्रातील जुनी काँग्रेस पार्टी मात्र एकसंध राहिली याचे बरेचसे श्रेय वसंतदादांकडे जाते. खुद्द इंदिरा गांधींनाही याची जाणीव होती. १९७२ च्या १६ मार्चला एक आश्चर्य घडले.

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / ३७