पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लहरीवर विसंबून न राहता, कृषि-उद्योगातून आपण कसे नशीब काढू शकतो याची समज शेतकऱ्याला आली. सायकल परवडत नसणारा शेतकरी बुलेट घेऊन धावू लागला! बँकांचे व्यवहार करू लागला. ही होती वसंतदादांची किमया.
 आमदार ते नामदार :
 जसजसे वसंतदादा राजकीयदृष्ट्या मोठे होऊ लागले तसतसे सांगलीच्या औद्योगिक कामांकडे त्यांना लक्ष देता येईना. काँग्रेस पक्षाला त्यांच्या नेतृत्वाची गरज होती आणि पक्षाचा सच्चा पाईक या नात्याने वसंतदादांना पक्षाच्या आदेशानुसार काम करणे आवश्यक होते. विशेषतः १९६० च्या दशकात त्यांची पक्षीय पातळीवरील आणि पर्यायाने राजकीय पातळीवरील घोडदौड सुरू झाली.

 एका बाजूने औद्योगिक कामे करत असताना वसंतदादा काँग्रेस पक्षाचे काम करत होतेच. १९५२ साली पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. पक्षाच्या आदेशानुसार वसंतदादांनी सांगली मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली आणि प्रचंड बहुमताने ते निवडून आले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात महाराष्ट्रात मोठमोठ्या मातब्बर काँग्रेस पुढाऱ्यांचे पानिपत झाले. काँग्रेस पक्ष दुभंगला, पण वसंतदादा हेच सांगलीच्या या जनतेसाठी निवडणुकीतील एकमेव पर्याय होते. अगदी अपक्ष उमेदवार म्हणून जरी ते कधी सांगलीत उभे राहिले असते आणि समोर कोणताही मोठ्यात मोठा पुढारी त्यांच्यासमोर उभा राहिला असता, तरी सांगली परिसरातील जनतेने त्यांनाच निवडून दिले असते. असे अलौकिक काम त्यांनी उभे केले होते. त्यामुळे १९५७ च्या संयुक्त महाराष्ट्राचे प्रचंड

३६ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील