पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अवलंबून असे. त्यामुळे उत्पन्नाची अनिश्चितता असे. वसंतदादांनी विचार केला की शेंग पिकाचा प्रक्रियात्मक उद्योग सुरू केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल. शेंगेपासून तेल, पेंड, तेलावर प्रक्रिया करून रिफाईन्ड तेल, वनस्पती तूप, पेंडीतील तेलाचा अंश काढून नायट्रोजनयुक्त खत, कॅटल व पोल्ट्रीसाठी पेंड उपलब्ध होईल; त्यातून तेल गिरण्या, रिफायनरी वनस्पती प्लॅट, साबण कारखाना वगैरे शेंगेवरील प्रक्रियात्मक उद्योग सुरू करण्याचे सर्वांच्या विचाराने ठरले. त्यानुसार २४ फेब्रुवारी १९६० लादि ग्राऊंडनट प्रोसेसर्स को-ऑप. सोसायटी रजिस्टर झाली.
 सांगली जिल्ह्यातील ३० विभागात प्रत्येकी एक या प्रमाणे ३० तेल गिरण्या काढायच्या ठरल्या. आसपासची शेंग सांगलीत आणण्याऐवजी शेतकऱ्यांच्या या गिरण्यांमध्येच तेल उत्पादन होणार होते. त्यामुळे ग्रामीण रोजगारही वाढणार होता. कल्पना उत्तम होती, पण दुर्दैवाने हा उपक्रम यशस्वी झाला नाही. शेंग, पेंड, तेल यांचा धंदा तेजी-मंदीवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असल्याने तेल गिरण्या टिकाव धरू शकल्या नाहीत. शेतकऱ्यांचे अज्ञान व अपुरा अनुभव हेही कारण होतेच.

 अशी अनेक छोटी-मोठी कामे वसंतदादा सांगली परिसरात धडाडीने करत होते. साखर कारखान्याच्या माध्यमातून कागदाचा कारखाना उभा करण्याचेही त्यांच्या डोक्यात घोळत होते, पण ते जमले नाही. सांगली जिल्ह्यात एकही माणूस बेकार राहता कामा नये असे वसंतदादांना मनापासून वाटे. त्याच त्यांच्या तळमळीमुळे अनेक उद्योग सांगली परिसरात उभे राहिले. सदोदित सावकाराच्या जबड्यात अडकलेला शेतकरी आता मुक्त झाला. नुसत्या पारंपरिक शेतीत अडकून न राहता, वरुणराजाच्या

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / ३५