पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोठे काम केले ते म्हणजे जल उपसा सिंचन योजनेचे. कारखान्याच्या प्रारंभकाळात चार योजना होत्या. पण अनेक कारणांनी त्या म्हणाव्या तितक्या उपयुक्त ठरत नव्हत्या. वसंतदादांनी ४६ नव्या योजना धाडसाने हाती घेतल्या. या योजनांमुळे २० हजार एक जिराईत जमिनीचे रूपांतर बागायती जमिनीत होणार होते. त्यासाठी सर्व संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी गहाण टाकून सरकारची जी अनुदान योजना होती ती राबवण्याचे ठरवले. मात्र शासकीय अधिकाऱ्यांच्या काही हरकती होत्या. तेव्हा वसंतदादांनी तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनाच सांगली भेटीवर आणले. अंकलखोप, भिलवडी, डिग्रज आणि पद्माळे या गावातील चार जल उपसा सिंचन योजनेचे काम कशा प्रकारे चालले आहे ते प्रत्यक्ष दाखवले. शेतकरी नव्या नव्या कल्पना राबवण्यासाठी आणि नवे नवे प्रयोग करण्यासाठी जी मेहनत वसंतदादांच्या प्रोत्साहनामुळे घेत आहे ती पाहून मुख्यमंत्री खूप प्रभावित झाले आणि शेतकऱ्यांना ज्या प्रकारे कर्ज मंजूर करून हवे होते त्याप्रमाणे मंजूर करण्याची त्यांनी व्यवस्था केली.
 या सगळ्या जल उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्यामुळे हजारो एकर जिरायती जमिनी पाण्याखाली आल्या. शेतकऱ्यांना दुबार पिके घेता येऊ लागली. शेती उत्पादनात त्यामुळे वाढ झाली. या योजनेसाठी जे सिमेंट पाईप्स लागत होते ते तयार करण्याचा कारखानाही सांगलीच्या साखर कारखान्यानेच सुरू केला. त्यामुळे वाजवी दराने सिमेंट पाईप्स शेतकऱ्यांना उपलब्ध झाले.

 औद्योगिक क्षेत्रातील वसंतदादांचे आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे शेंगदाणा तेल पेंड कारखाना. शेंग पिकविणारा जिरायत नेहमीच निसर्गावर

३४ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील