पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कारखान्यांच्या शेडस्ही उभ्या राहिल्या. वसंतदादांच्या या औद्योगिक सोसायटीने स्वतः पुढाकार घेऊन अनेक कामे मार्गी लावली. आपल्या अखत्यारित नसलेल्या कामांसाठीही धडपड केली. शेडस् उभ्या करणाऱ्या कारखानदारांना माफक दरात कच्चा माल, वायर, पत्रे, प्लेटस्, पिग आयर्न आदी गोष्टी मिळवून दिल्या. यामुळे लवकरच फौंड्री, फोर्जिंग, सिमेंट वस्तू, लेदर गुडस्,'काटेरी तार, रीरोलिंग मिल, ऑप्टिकल बकेट, पेपरमिल, फॅब्रिकेशन अशा विविध प्रकारचे कारखाने या औद्योगिक वसाहतींमध्ये उभारले गेले. कामाची सुरुवात झाल्यापासून वर्षभरात काही कारखाने कार्यान्वितही झाले. हा झपाटा पाहून मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणही अचंबित झाले. वसंतदादांची पाठ थोपटत ते म्हणाले,
 “दादा, मी नव्या औद्योगिक महाराष्ट्राचे स्वप्न तुम्हाला सांगितले, तर तुम्ही उसंत न घेता प्रत्यक्षात आणत आहात. कमाल आहे तुमची!"
 जल उपसा सिंचन योजना आणि तेल पेंड कारखाने :
 मार्केट यार्ड, साखर कारखाना आणि औद्योगिक वसाहत ही वसंतदादांनी १९५० ते १९६० या दशकात उभी केलेली तीन मोठी कामे. या तीन गोष्टींमुळे सांगली गावाचा जणू काय, कायापालटच झाला म्हणावा इतकी सांगली अमुलाग्र बदलून गेली. अनेक गरजू हाताना काम मिळाले. महत्त्वाकांक्षी तरुणांना उद्योगाची नवी स्वप्ने मिळाली. ती स्वप्ने पुरी करण्यासाठी काय करायचे याचे दिशादर्शक मार्ग मिळाले.

 सांगली उद्योगधंद्यांनी गजबजून गेली. वसंतदादांमुळे सांगलीची सर्वत्र प्रसिद्ध झाली. या तीन मोठ्या कामांबरोबरच अनेक छोटी-मोठी कामे वसंतदादांनी केली. आपल्या साखर कारखान्याच्या आधारे त्यांनी एक

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / ३३