पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोठ्या उद्योगांबरोबरच पूरक उद्योग आणि लहान उद्योग सुरू करण्याचे ठरले. त्यामुळे स्थानिक कारागिर आणि छोटे उद्योजक यांना आपले कौशल्य दाखवण्यास वाव मिळणार होता. अनेक कामगारांना त्यायोगे काम मिळेल असा वसंतदादांचा होरा होता. चीफ प्रमोटरचे काम नेहमीप्रमाणे वसंतदादांनाच करावे हे उघडच होते. प्रमुख उद्योजकांचे एक प्रवर्तक मंडळ निवडण्यात आले. नियोजित औद्योगिक सोसायटीसाठी साखर कारखान्यालगतची माळ बंगल्यावरील जागा निवडण्यात आली. त्या जागेपैकी बरीचशी जागा सांगलीचे माजी अधिपती चिंतामणराव पटवर्धन यांची होती. वसंतदादांनी शब्द टाकताच त्यांच्या एकूण धडपडीचे आणि आजवरच्या एकूण कार्याचे कौतुक असल्याने राजेसाहेबांनी आपल्या अखत्यारीतील जागा वसंतदादांच्या चांगल्या कामासाठी देण्याचे त्वरित मान्य केले. लागलीच त्या जमिनीवर प्लॉटस् पाडून त्यासाठी मंजुरी घेण्यात आली. मूळ जमिनीलगत असलेल्या इतर जमीन-मालकांबरोबर बोलणी करून एकूण १३५ एकर जागा या नियोजित औद्योगिक वसाहतीसाठी मिळविण्यात आली.

 सांगली नगरपरिषदेचे सहकार्य असल्याने, वीज, पाणी आदी बाबींची त्वरेने पूर्तता झाली. आता शेअर भांडवल जमा करण्यात फार अडचण नव्हती. मार्केट यार्ड आणि साखर कारखाना या दोन मोठ्या कामांमुळे लोकांचा वसंतदादांवरील विश्वास शतपटीने वाढला होता. एकूण क्रयशक्तीही वाढली होती. त्यामुळे भागभांडवल बघता बघता जमा झाले. २ ऑक्टोबर १९६० रोजी विधान परिषदेचे अध्यक्ष वि. स. पागे यांच्या हस्ते पायाभरणी झाली आणि अवघ्या दहा महिन्यात अनेक

३२ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील