पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महाराष्ट्रातील उद्योगधंद्याची स्थिती नगण्य आहे. तेव्हा हा प्रादेशिक असमतोल दूर करणे अत्यावश्यक आहे.
 वसंतदादा म्हणजे यशवंतरावांचे चेले. त्यांचा प्रत्येक शब्द मनापासून उचलून धरणारे. त्यांनी परिषदेला उपस्थित राहून परतल्यावर त्वरेने त्यांचा संदेश अमलात आणण्याचा निश्चय केला. ही गोष्ट आहे १९६० मधील. वसंतदादांनी औद्योगिकरणाच्या दृष्टीने सुरुवात तर केली होतीच. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना एकत्र बोलावले. यशवंतरावांचे मार्गदर्शक विचार व संदेश सांगितला. सांगलीच्या दृष्टीने साधक-बाधक चर्चा केली. त्यानुसार सांगलीच्या औद्योगिक विकासाची योजना आखण्यापूर्वी, भारतात इतरत्र चालू असलेल्या औद्योगिक वसाहतींची पाहणी करावी असे ठरले. त्यानुसार वसंतदादा आपले सहकारी- उद्योजक सर्वश्री शामराव भिरंगी, बाबुराव आरवाडे, दांडेकर, भिडे, चारुभाई शहा, नेमचंद शहा, आप्पासाहेब सावंत, डॉ. देशपांडे, गोटखिंडे आदी मित्रांसमवेत आधी हैदराबादला गेले. तेथील सरकारी औद्योगिक वसाहतींची पाहणी करून आले. नंतर सर्व मंडळी पंजाबात गेली. तेथे काकासाहेब गाडगीळ राज्यपाल होते. वसंतदादांचे त्यांच्याशी जुने घनिष्ठ संबंध होते. त्यांनी सरकारी अधिकारीच बरोबर दिल्यामुळे अमृतसर, बटाला, लुधियाना, जालंदर येथील कारखाने व्यवस्थित सर्वांना अभ्यासता आले. नंतर सर्व मंडळी परतली.

 सांगलीत १५ जुलै १९६० रोजी वसंतदादांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. एकूण केलेल्या पाहणीच्या आधारे सांगलीत सहकारी औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचे ठरले. या वसाहतीमधून

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / ३१