पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पण वसंतदादांनी त्याकडे फार लक्ष दिले नाही. साखरेचे उत्पादन झाले पण मळी फुकट गेली तर काय उपयोग? अल्कोहोल निर्मिती करून जर परकीय चलन मिळणार आहे, अनेकांना रोजंदारीची संधी उपलब्ध होणार आहे तर डिस्टीलरी उद्योग का करू नये असा व्यावहारिक विचार वसंतदादांनी केला. अशा अनेक उपधंद्यांमुळे साखरेवरचा उत्पादन खर्चही आपोआपच कमी होत होता. या सर्व गोष्टींमुळे वसंतदादांनी साखर कारखानाही आपल्या सर्वांसाठी एक कामधेनूच ठरणार आहे असे जे म्हटले त्या द्रष्ट्या उद्गारांची प्रचिती सर्वांनाच येऊ लागली.
 औद्योगिक वसाहत :

 स्वातंत्र्यप्राप्तीनंतर म्हणजे १९४७ नंतर मराठी माणसासाठी स्वतंत्र राज्य १ मे १९६० रोजी निर्माण झाले. सुरुवातीला मुंबई इलाखा होता. १९५६ ला भाषावार प्रांतरचना झाली. पण महाराष्ट्राला डावलले गेले. गुजरात राज्याबरोबर त्याची मोट आवळली जाऊन, महाराष्ट्र-गुजरात असे द्वैभाषिक राज्य राबवले गेले. संयुक्त महाराष्ट्राच्या अभूतपूर्व आंदोलनाचा इतिहास सर्वांना माहीत आहेच. त्यामुळे अनेक राजकीय उलथापालथी होऊन महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांना महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक-औद्योगिकदृष्ट्या पंजाबसारखे अत्यंत प्रगत राज्य बनवायचे होते. त्यांच्या प्रेरणेने नवमहाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला मार्गदर्शक अशी एक औद्योगिक परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी खंत व्यक्त केली होती की, पुणे-मुंबईचा भाग सोडला तर इतर

३० / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील