पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जर्मनीमधून बकाव वूल्फ कंपनीची अवजड मशिनरी येऊन पडली. या सगळ्या अथक प्रयत्नांमधून या ओसाड माळरानावर एक अभूतपूर्व चमत्कार घडला. १९५८ मध्ये तीन-चार वर्षांच्या घोर तपश्चर्येनंतर साखर कारखान्याचा पहिला गळिताचा हंगाम सुरू झाला. जमिनीतून उगवलेल्या उसाच्या पोटातून पांढरी शुभ्र साखर बाहेर पडू लागली ! आणखी एका अर्थाने हा चमत्कार होता. वास्तविक कारखान्याचे रजिस्ट्रेशन मिळाल्यापासून पहिला गळीत हंगाम सुरू करण्यास ३९ महिन्यांचा अवधी रितसर मिळतो, पण परिस्थिती प्रतिकूल असतानाही, वसंतदादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, कामगारांनी, दिलेल्या मुदतीच्या जवळजवळ सव्वा वर्ष आधीच साखर कारखाना सुरू करून दाखवावा हाही एक चमत्कार होता. वसंतदादांच्या आजवरच्या वाटचालीमधला यशाचा हा एक मोठा टप्पा होता. या यशाने त्यांच्या मनाला खरेखुरे समाधान लाभले.

 कारखाना उभा राहण्याआधी कार्यकर्त्यांच्या बैठकीत वसंतदादांनी सांगितलं होतं, हा साखर कारखाना म्हणजे एक कामधेनूच ठरेल. ‘या कारखान्यातून दुसऱ्या अनेक योजना उभ्या राहतील.' आणि तसंच झालं. साखरेच्या प्रमुख उत्पादनाबरोबर अनेक उपधंदे सुरू झाले. अॅसिटाल्डिहाईट अॅसेटिक अॅसिड, अॅसेटिक अनहैड्राईड ही रसायने, पशुपक्ष्यांसाठी खुराक, विविध फळझाडे, नर्सरी वगैरे उपधंद्यांबरोबरच या साखर कारखान्याने अल्कोहोल निर्मिती सुरू केली तेव्हा यावर खूप टीका झाली होती

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / २९