पान:सभाशास्त्र.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र अध्यक्षाची सूचना करून पसंत असेल तो अध्यक्ष निवडतां येईल व त्याने सभेचे काम सुरू केल्यास तेच काम कायदेशीर व योग्य ठरेल. परंतु सभाचालकांचा एक अध्यक्ष व सभेचा दुसरा अध्यक्ष असे दोन अध्यक्ष व दोन सभा व दोन्हींची कामे चालणे शक्य नसते. सभेने अध्यक्ष निवडला याचा अर्थ सभाचालकांच्या बाजूचे जमलेल्या मंडळींत अल्पमत आहे. सभाचालक या परिस्थितीत सभा बरखास्त झाल्याचे जाहीर करतील; किंबहुना सभेचे बहुमत विरुद्ध आहे याची जाणीव अध्यक्षाबाबत आक्षेप येतांच होते व अस्थिर वातावरण पाहून, ते निमित्त करून सभेने आपला अध्यक्ष निवडण्यापूर्वीच सभाचालक सभा रद्द झाल्याची घोषणाही करतात. तथापि त्यांच्या घोषणेने जमलेली सभा रद्द होत नाही. तिला शांतपणे जाहीर निमंत्रणांत उल्लेखिलेले काम करण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर सभास्थान खाजगी असेल तर ही सभा सुरू झाल्यानंतर कांहीं मोडतोड झाल्यास त्याची जबाबदारी मात्र अध्यक्षावर येईल, ज्यांनी जागा घेतली त्यांनी सभा रद्द केली येवढ्याने तेथे जाहीर निमंत्रणाने जमलेली सभा जर शांततेने काम करीत असेल, तर तिला बाहेर काढून लावण्याचा मालकाला अगर पोलिसांना अधिकार प्राप्त होत नाहीं. सार्वजनिक जागीं सभा असल्यास शांततेने काम होत आहे तोपर्यंत पोलिसांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीं. अध्यक्ष कसा असावाः शरीररचनेत जे प्राधान्य शिराला आहे तेच सभेमध्ये सभापति यास आहे. अधि आहेत अक्ष ज्याचे म्हणजे इतरांपेक्षां उच्चतर दृष्टीने पाहणारा व लौकिक अर्थाने त्याचे स्थान सभासदांचे स्थानापेक्षा उच्च असते म्हणूनही वरून पाहून सर्वसभा निरीक्षण करणारा तो अध्यक्ष होय; म्हणून सभापति अगर अध्यक्ष योग्य असावा हे इष्ट आहे. सभापति म्हणजे सभेचे संमतीने निवडलेला अगर मान्य केलेला सभाकार्याचा नियंत्रक होय. अध्यक्षाची जागा मानाइतकीच जबाबदारीची आहे. सभेचे यश हे सर्वस्वी त्याचे कर्तृत्वावर अवलंबून असते. प्रसंगाला शोभेल व प्रसंग निभावून नेईल असा तो असावा असे थोडक्यांत त्याचे लायकीसंबंधी सांगता येईल. लोकमताने तो लोकप्रिय ठरतो, त्याला अधिकार प्राप्त होतो, पण लायकी बहुमताने मिळत नाहीं, ती असावी लागते. सभेच्या स्वरूपाला अनुरूप अध्यक्ष निवडण्याची जबाबदारी सभेइतकीच सभाचालकांची आहे. सभाचालकांची निवड सभा नापसंत करण्याचे प्रसंग अपवादात्मकच असतात. एकसष्टीचे प्रसंग तरुण