पान:सभाशास्त्र.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७ सार्वजनिक सभातंत्र कोटिक्रम लक्षात घेऊन, प्रदर्शित झालेले विचारप्रवाह व दृष्टिकोन यांचे अवलोकन करून आपला निर्णय द्यावयाचा हें सभेचे मुख्य सूत्व आहे. सभेची सुरुवात द्वैताने होऊ नये, सभा अशी एक घटना आहे की, चर्चेनंतर झालेला निर्णय हा सर्वांचा म्हणजे सभेचा समजला जातो, थोड्या अगर अधिक व्यक्तीचा नव्हे, त्याला सामुदायिक निर्णयाची प्रतिष्ठा आहे. कोणाची सरशी झाली अगर कोण मागे पडले, ही क्षुद्र भावना व्यक्तींची. झालेला निर्णय सामुदायिक जीवनाचा, समाजाचा असा त्याचा व्यापक अर्थ आहे; म्हणून सभास्थानी सर्वांनी एकत्र यावे, विचार करावा, तेजस्वी व्हावे, मतभेद जरूर मांडावेत. त्यासाठी दूरदूर बसण्याचें अगर मारामारी करण्याचे कारण नाहीं. तथापि, कांहीं काही व्यक्ति व गट हे केवळ सभा मोडण्यासाठी, सभेत अङथळे उत्पन्न करून गोंधळ माजविण्यासाठी आलेले असतात. ते जेथे बसले असतील तेथे आसपास सशक्त व दक्ष स्वयंसेवक ठेवणे इष्ट ठरते. सभेमध्ये व्यवस्था व शांतता दोन्ही ठेवण्याची जबाबदारी सभाचालकांवर आहे; म्हणून भरपूर स्वयंसेवक अगर कार्यकर्ते यांचे दल असावे. कांहीं जागजागी व्यवस्थेसाठी ठेवून एक भाग प्रसंग पडेल त्याप्रमाणे वाटेल तिकडे नेण्यासाठी बाजूस राखून ठेवल्याने पुष्कळ कार्य सुलभ होते. जेथे विरोधक संघटितपणे अडथळा उत्पन्न करीत आहेत, सभा मोडण्याचा प्रयत्न करीत आहेत व त्यांना अध्यक्षांनी योग्य रीतीने वागण्याबद्दल बजाविले असताही त्यांचे न ऐकतां ते वागत राहतील तर, त्यांना सभेतून बाहेर काढण्याचा हक्क अध्यक्षांना आहे. बाहेर काढण्याची आज्ञा अध्यक्षांनी दिल्यानंतर राखीव स्वयंसेवकांनी येऊन असल्या विरोधकांना झटपट, वादविवाद न करता, वाजवी शक्तीचा उपयोग करून बाहेर न्यावे. त्यांच्याशी वादविवाद केल्याने सभेत गोंधळ होतो, सभा मोडते व विरोधक आयतेच यशस्वी होतात, त्याचप्रमाणे सभेत अडथळा झाला असतां वाटेल तेथल्या स्वयंसेवकांनी त्या ठिकाणी धावून जाऊ नये, ज्याचे काम त्याने करावे. स्वयंसेवक नम्र पण निश्चयी असला पाहिजे. सभेमध्ये व्यवस्था व शांतता राहण्याचे दृष्टीने सर्वांत महत्त्वाची कामगिरी सभापतीवर असते; म्हणून विषयाचे व परिस्थितीचे महत्त्व जाणून योग्य सभापति निवडणे हे अत्यंत जरूर असते. तो जर अर्धवट असेल, अस्थिर असेल, तर शांत सभासुद्धा बेताल होईल. घोरणी व दक्ष सभापति असला म्हणजे तो युक्तीने, गोडीगोडीने, खेळीमेळीने विरोधकांवर छाप पाडून त्यांना