पान:सभाशास्त्र.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २० अधिक माणसे एकत्र जमलीं व जर त्यांचा समान उद्देश खालील गोष्टी करण्याचा असेल तर तो जमाव गैरकायदा जमाव होईल ( Unlawful Assembly). १. विधिविषयक अगर कार्यकारी हिंदुस्थान सरकार, अगर इलाखा सरकार, अगर लेफ्टनंट गव्हर्नर अगर कोणीही सार्वजनिक नोकर आपले कर्तव्य करीत असतांना शक्तीने अगर शक्तीचा धाक दाखवून घाबरवून सोडणे, २. कायद्याचे अमलबजावणीस विरोध करणे. ३. अपकृत्य, अन्यायाची आगळीक अगर अन्य गुन्हा करणे, ४. शक्तीचे जोरावर अगर शक्तीचा धाक दाखवून मिळकतीचा ताबा घेणे अगर अन्य कांहीं हक्क लुबाडणें अगर हस्तगत करणे. ५ तसेच एखाद्या इसमास बेकायदेशीर गोष्ट करावयास लावणे अगर कायदेशीर गोष्ट न करण्यास भाग पाडणे. सुरवातीस कायदेशीर असलेला जमाव पुढे गैरकायदा जमाव होऊ शकतो. गैरकायदा जमाव आहे हे समजून जो त्यांत मिळतो अगर त्यांत राहतो तो त्या गैरकायदा जमावांतील एक होतो व गुन्हेगार ठरतो. पांच माणसे तरी एकत्र आली पाहिजेत व त्यांचा सर्वाचा उद्देश वर लिहिल्याप्रमाणे असला पाहिजे. समान उद्देशासाठी गैरकायदा जमावाने अगर त्यांच्यापैकी एकाने जरी शक्तीचा अगर हिंसेचा उपयोग केला म्हणजे गर्दीचा (Riot ) गुन्हा होतो व जमावांतील प्रत्येकजण गुन्हेगार होतो. इंग्लंडमध्ये तीन माणसे तरी कायद्याने मना केलेली (forbidden by law ) गोष्ट करण्यासाठी एकत्र आली म्हणजे ती गैरकायदा जमाव ठरतात. जमाव कायदेशीर आहे पण पोलिसांनी अगर अन्य अधिकायांनी, कायेदशीर हुकूम देऊन निघून जाण्यास सांगितले असतां न जाणे, म्हणजे कायदेशीर हुकमाला विरोध करण्याचे हेतूने एकत्र राहणे असे होते व तो जमावे गैरकायदा जमाव होतो. पण गैरकायदा हुकमाचा विरोध करणे हा गुन्हा नाही. त्याचप्रमाणे कायदेशीर गोष्टीसाठीं सभा भरली असतां, विरोध उत्पन्न होईल, शांतताभंग होईल, येवढ्यावरून ती सभा गैरकायदा जमाव होत नाही. तसेच सभेचे काम कायदेशीर रीतीने चालले असतां कोणी विरोधकांनी तिचे काम बंद पाडण्यासाठी तिचेवर हल्ला केला व तो परतवून लावतांना आत्मसंरक्षणार्थ कायद्याप्रमाणे शक्तीचा उपयोग केला, तर ती सभा गरकायदा जमाव होत नाहीं. सभा जर गैरकायदा गोष्टींसाठी भरली नसेल व कलम १४१ प्रमाणे जमलेल्या लोकांचा उद्देश नसेल, तर ती सभा गैरकायदा जमाव होणार नाही. गैरकायदा सभा गैरकायदा जमाव होतो असे नाही.