पान:सभाशास्त्र.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३७ | सभानियमन व संचालन बाध न येतां चांगलेच वळण लागते. प्रसंगी सभेला पसंत पडणारे भाषण थोडे अधिक वेळ होऊ दिल्याने अध्यक्षावर कोणी आक्षेप घेत नाहींत. नापसंत भाषण कालमर्यादा असली म्हणजे श्रोते सहन करतात. टाळ्या अगर आरडाओरड होऊन भाषण संपण्यापेक्षां कालमर्यादा संपली म्हणून संपविणे हे सदभिरुचीला व सहिष्णुतेला धरून आहे. कालमर्यादा असली म्हणून वाटेल ते बोलण्याचा हक्क प्राप्त होत नाही. तथापि अल्पसंख्यांतील वक्त्यांना अध्यक्षाने थोडा अधिक वाव दिल्यास चर्चेत कडवटपणा येत नाहीं. निदान कमी येतो. श्रोते विरुद्ध, भाषणाला नियमित वेळ आणि त्यांत कडक नियंत्रण झाले तर वक्ता चिडणे अधिक शक्य असते. भडभडून बोलू दिल्याने वक्त्याला समाधान वाटते, व श्रोत्यांची करमणूकही होते. तथापि भाषण शिवराळ व असभ्य होणार नाही, याची दक्षता अध्यक्षाने घेतली पाहिजे. | प्रसंगी चर्चेचा विषय महत्त्वाचा असतो, त्या वेळी कालमर्यादा वाढविणे अगर न ठेवणेही इष्ट असते. असल्या प्रसंगी वक्त्याने प्रसंग जाणून भाषण केले पाहिजे, चर्वितचर्वण, पुनरुक्ति, अप्रस्तुत मुद्दे हे त्याने होऊन वज्र्य केले पाहिजेत. श्रोत्यांची मने त्यांना कंटाळा आणून वळविता येत नाहींत हैं। वक्त्याने लक्षात ठेविले पाहिजे. उभे राहावें, वर मान करून बोलावे व न्यायाधीश डुलक्या घेण्यास सुरवात करण्यापूर्वीच भाषण संपवावे, म्हणजे तें प्रभावी होते हाच उपदेश सभेतील वक्त्यांना लागू आहे. (Stand up, speak up and bring your argument to a close, before the learned judge begins to dose ). विषयाचे महत्त्व जाणून दूर केलेली कालमर्यादा अस्थानी न ठरावी अशी चर्चा व्हावी. कालमर्यादा वाढवितांना अगर दूर करतांना सभेची अगाऊ संमत असणे इष्ट आहे, व असा प्रघातही आहे. तसेच जेथे कालमर्यादा नाही अशा विषयावर सभेचे संमतीने कालमर्यादा घालणेही इष्ट असते, व तसा प्रघातही आहे. विषयाची चर्चा सुरू होण्यापूर्वी कालाचे बाबतींत काय नियमन राहील याचा निर्णय जेथे नियम नसेल तेथे अध्यक्षाने सभेच्या संमतीने घ्यावा. जेथे नियमाप्रमाणे कालमर्यादा आहे तेथे प्रसंग जाणून त्याने वाढवावी अगर सभेची संमति घेऊन वाढवावी. जेथे नियमानें कालमर्यादा नाहीं, उदा० विधिमंडळांतील बिलावर, तेथे होणारे भाषण जर अप्रस्तुत, पुनरुक्तिपूर्ण अगर भाषणस्वातंत्र्याचा दुरुपयोग करणारे, नियमांचा दुरुपयोग करून हेतूपूर्वक अडथळा करणारे असेल तर,