पान:सभाशास्त्र.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र १ ०४

उभे राहून बोलावेः- ज्याचें नांव अध्यक्षाने घेतले असेल त्याने उभे राहून बोलावें. तो आजारी अगर अपंग असेल तर त्याने अध्यक्षाचे परवानगीने बसून बोलावें. उभे राहून बोलण्याने सर्व सभा न्याहाळता येते, अभिनयाला वाव मिळतो, वक्त्याचा आवाज अधिक दूरपर्यंत जाऊ शकतो व अधिक सभासदांना वक्त्याला पाहतां येते. वक्ता आणि श्रोता यांच्या नज़रा एकमेकांस भिडल्या पाहिजेत. त्यांच्यांत एक विशिष्ट तादात्म्य उत्पन्न झाल्याशिवाय वक्तृत्व यथार्थ होत नाही. गारुडी व नाग यांच्या नजरा भिडल्याशिवाय पुंगीला माधुर्य येत नाही व नागही फणा काढून डोलत नाही. आवाजाचा चढउतार, त्यांतील लहरी, अर्थानुरूप अभिनय हे सर्व श्रोत्यांनी ऐकलें व पाहिले म्हणजे त्यांचे मनांत वक्ता प्रवेश करू शकतो. आपल्या बोलण्याचा श्रोत्यांवर होणारा परिणाम न पाहतां, समजून न घेतां बोलणारा वक्ता स्वतः होऊनच आपले भाषण लवकर आटोपते घेतो अगर सभा त्यास तसे करावयास लावते. उभे राहून बोलण्याने श्रोत्यांची मनें वक्त्याला दिसतात असे म्हटले तरी चालेल. वक्ता उभे राहून बोलत असला म्हणजे त्याच्या शब्दांचा खराखरा अर्थही त्याने केलेल्या हावभावांवरून श्रोत्यांना अधिक चांगला समजतो. वक्ता सभेला दिसला पाहिजे हे सर्व दृष्टीने इष्ट आहे व तें वक्ता उभं राहून बोलल्याने साध्य होते. शिवाय सभा ही सामुदायिक स्वरूपामुळे श्रेष्ठ आहे. ही देवता प्रसन्न करून घ्यावयाची आहे म्हणून तिजपुढे उभे राहून बोलण्यान तिची प्रतिष्ठा राखली जाते. वक्त्याचाही त्यांत गौरवच असतो. वक्त्याने उभे राहून बोलावे हा संकेत प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. कौरवसभेत श्रीकृष्णानींही तो पाळला होता. अंगदाने राजसभेत बसून बोलण्यास सुरवात केली तेव्हां रावणाने त्यास अशिष्ट म्हणून संबोधिले आहे. सर्व विधिमंडळांतून हा संकेत चालू आहे. जेथे जेथे राजा अगर राजप्रतिनिधि विधिमंडळांत येतो तेथे सुद्धा राजा अगर त्याचा प्रतिनिधि उभे राहून बोलतो. सभेमध्ये उभे राहून बोलले पाहिजे हा नियम अध्यक्षासुद्धा सर्वांना लागू आहे. अध्यक्षानें कांहीही निर्णय देतांना, भाषण करतांना, चर्चेचा ठराव वाचून दाखवितांना, मतांचा निकाल जाहीर करतांना उभे राहिले पाहिजे, जेथे हैं। आचरणांत येत नसेल तेथे ते गैर आहे व ती अयोग्य परंपरा आहे. भाषण केले पाहिजेः--वक्त्याने भाषण केले पाहिजे म्हणजे त्याने ते वाचून दाखवितां कामा नये, लेखी भाषण में भाषण नव्हे, ते वाचन आहे.