पान:सभाशास्त्र.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ing in a disorderly manner and preventing the transaction of business ) ती मोडण्याचा प्रयत्न केल्यास अगर मोडल्यास ते कृत्य नुसते गैरशिस्त अगर गर्दाचे कृत्य न होतां ‘सभा मोडणे' हा एक स्वतंत्र गुन्हा होतो व निवडणुकीच्या गैरकायदा व लांचलुचपतीच्या प्रकारांतला हा एक प्रकार समजला जातो, अशी व्यवस्था आहे. (Breaking a meeting is an offence and comes under the Illegal and corrupt Practices, Act.) याचा अर्थ फक्त निवडणुकीचे धामधुमीचे काळांत सभा भरविणे हा हक्क आहे. खरें लोकमत कळण्यासाठी जर ही व्यवस्था असेल तर ती सर्वत्र व सर्वकाळ असली पाहिजे. नागरिकाला आपले मत, आपला अभिप्राय जाहीर करण्याचा हक्क असला पाहिजे व तो घटनेनें अगर कायद्याने मान्य केला पाहिजे. एकत्र येण्याचा- सभा भरविण्याचा, विचार जाहीर करण्याचा हक्क घटनेने मान्य केलेला असो अगर संकेताने, परंपरेने प्रतिष्ठा पावलेला असो, आजच्या जगांत तो महत्त्वाचा व मौलिक असा मानला जातो. विचारप्रसाराचें तो एक प्रभावी साधन आहे. व्यक्तिविकासाला व समाजाचे प्रगतीला त्याची अत्यंत जरूरी आहे. व्यक्ति आपले व्यक्तित्व व्यापक व्हावे म्हणून. त्याला व्यापक क्षेत्र मिळावे म्हणून, संघप्रवृत्त होते. स्वगत भाषण करणे व सभेत बोलणे या दोन्हींतील आनंदांत फरक आहे. सभेत, संघांत मनुष्याच्या विधायक शक्तीला, कर्तृत्वाला आवाहन असते. चंद्रकांत मण्याला पाझरण्याला चंद्र लागतो; व वक्त्याचे कौशल्यासाठी श्रोते लागतात, “ म्हणउनी वक्ता तो वक्ताच नोहे। श्रोतेविण ।। या दृष्टीनें सभेचे महत्त्व किती आहे हे लक्षात घेतां सभेसंबंधी समाजांत सम्यक्ज्ञान होणे इष्ट आहे. नट, नाटक व नाटकगृह या सर्वांचा चांगला संच असला, सर्व व्यवस्था उत्कृष्ट असली म्हणजे श्रोत्यांचा आनंद श्रेष्ठ दर्जाचा असतो. ते क्षण त्यांना अमोलिक वाटतात, त्यांची मने उन्नत होतात, दक्ष सभापति, चतुर वक्ता, शिस्त चाललेली सभा पाहून श्रोत्यांनाही एक विशिष्ट प्रसन्नता वाटत असते. त्यांचे मन उन्नत वातावरणाचा अनुभव घेते. नमुनेदार सभा व्हावी हीच सर्वांची इच्छा असली पाहिजे आणि ती सफळ व्हावी यासाठी सभापति, सभासद, सभासंचालक सर्वांनीच आपापली जबाबदारी ओळखून सहकार्याने वागले पाहिजे. त्या कामी उपयुक्त होईल असे विवेचन करण्याचे ध्येय या लिखाणाचे आहे.