पान:सफर मंगळावरची.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

न्हाय खेळत. असं म्हणावं तर म्हणतील, जा घरात बस. तुला कुणी बोलावलं होतं? त्यापेक्षा जरा गोडीगुलाबीनं घ्यावं... मी नम्रतेनं म्हटलं, अरे मला फलंदाजी द्या ना. माझा पडेल चेहरा पाहून म्हणा किंवा फलंदाजी करणारे दमलेत म्हणून म्हणा दिली त्यांनी फलंदाजी. खरं तर क्षेत्ररक्षणामुळे पार दमलो होतो. पण रूबाब दाखवायचा होता ना. ऐटीत धोनीसारखं उभा राहिलो. अन् ठोकला पहिल्या झटक्यात षटकार.... अरे ऽ रे ऽऽ त्या भावड्याने सीमेवरच झेल घेतला. मी म्हटलं, ये पहिलाच चेंडू जाऊ दे ना. दुसऱ्या चेंडूपासून बाद धरायचा. तर कुणी ऐकूनसुद्धा घेईनात. लगेच डच्चू. घरात गेलो तर आईचं तुणतुणं सुरू, कसा रे तू रडूबाई, बाद झाला की रडतोस ? आता संघातूनच बाद केल्यावर..... एवढा वेळ क्षेत्ररक्षण करूनसुद्धा... माझ्यावर अन्याय झाल्यावरसुद्धा डोळे ओले होणार नाहीत का? तुम्हीच सांगा.

* * *
९४ । सफर मंगळावरची