पान:सफर मंगळावरची.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काय झालं. वैताग येतो. आईला म्हणालो,
 "आपण जाऊ का मामाच्या गावाला ?"
 "हो रे जाऊ यात. एकदोन दिवसांनी जाऊ या. जरा चकल्या, चिवडा करते, अण्णांना बेसनाचे लाडू करते."
 अण्णा म्हणजे आईचे वडील. आता अण्णा हिरड्यांनी चावून खाणारेयत 'का? नाहीतर ताईआज्जी अण्णांना चिवडा, चकल्या खलबत्त्यात बारीक करून वाटीत घालून चमच्याने खायला सांगते. कसं करून पण खा. बायकांना त्याशिवाय आनंदच मिळत नाही. पण चकल्या बाबांच्या तावडीतून शिल्लक राहिल्या तर ना !

 आजोळी गेलं तर तिथं पोरांनी घर गच्च भरलेलं. आता खूप खेळायला मिळणार. क्रिकेट खेळताना तर अशी चौकार, षटकारची आतषबाजी करतो की, कप्तान हो म्हणून मागंच लागायला पाहिजे. खेळायला गेल्यावर पहिल्यांदा ये, ये म्हणतात. इथं उभा रहा, तिथं उभा रहा. म्हटलं सुरुवातीला क्षेत्ररक्षणच करायला पाहिजे. लगेच फलंदाजीची आशा धरण्यात काय अर्थय. असा समंजस विचार करून उभा राहिलो. चेंडू पळेल तिकडे पळतो, धडपडतो, लोळतो, जमिनीवर डाय मारतो. त्याशिवाय प्रभाव पडणारेय का? जमिनीवर झेप घेत चेंडू पकडल्याशिवाय चांगला क्षेत्ररक्षक सिद्धच होत नाही. पूर्वी कसं, पूर्वी म्हणजे जमिनीवर लढाया होत, राजेलोकांच्या त्याकाळातलं म्हणतोय. चांगल्या योद्ध्याच्या अंगावर जखमांचे व्रण असायचे, तो त्यांचा बहुमान असायचा, अलंकार असायचा. तसंच क्रिकेट खेळताना जमिनीवर झेप घेत चेंडू पकडल्यावरच कपड्यावर मातीचे डाग पडतात, त्याचा अभिमान वाटतो. कारण तोच चांगला क्षेत्ररक्षक ठरतो. शूज मात्र स्वच्छ ठेवायची सवय लावायला पाहिजे. नाहीतर विमानतळावरून माघारी पाठवायचे. टीशर्टला मराठीत काय म्हणतात, गंजीफ्रॉक ? हा पूर्ण मराठी शब्द वाटत नाही. त्यापेक्षा टीशर्टच म्हटलेलं बरं, तर टीशर्टवरचे डाग घालवण्यासाठी मात्र चाकांचं चित्रं असलेला व्हिल साबण वगैरे लावू नकोस, असं आईला मुद्दामच सांगतो. डाग तसाच राहू दे. डाग चांगला असतो. तर मला हे क्षेत्ररक्षणाच्या वेळी जमिनीवर झेप मारण्याचे भारी वेड लागलं. आजोळी खेळताना सुरूवात क्षेत्ररक्षणापासूनच केली. अर्धा तास, एक तास, दीड तास किती वेळ क्षेत्ररक्षण करायचं अन् मातीत लोळायचं, अं? वैतागलो. धावांचा डोंगर उभा करण्यासाठी जीव आसुसला होता. आता धीर धरवेना. ये मला फलंदाजी द्या न्हायतर मी

सफर मंगळावरची । ९३