पान:सफर मंगळावरची.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असा मी... तसे ते... /२


आमची ताई म्हणजे ना. घरातली महाराणीच आहे. आमची आजी तिला राणीच म्हणते. पण ती आहे महाराणी. बाबा तर सगळं ताईचच ऐकतात. ताईची परीक्षा संपली की, ताईला सिनेमाला जायचं असतं. आई म्हणाली, नाटकाला जाऊ. तर नाही. ताई म्हणतेय ना सिनेमाला तर सिनेमालाच. मला तर कुणी विचारातच नाही. बिनखात्याचा राज्यमंत्रीच मी. एकदा बाबा म्हणाले, "खवय्यामधले जेवण छान असतं. गुजराती थाळी तर अप्रतिमच." आईला पण गुजराती थाळी फार आवडते. तर ताई म्हणाली.
 "हॉटेल 'मेरा' नाहीतर 'वाटीका' मध्येच जाऊ या."
 झालं. गुजराती थाळीमधील मुगाची खिचडी, त्यावर अशीऽऽ वरपर्यंत जाणारी तुपाची धार, सगळं सोडून कोंबडीची तंगडी तोडत बसली. हे एकवेळ ठीके. कारण तसं कोंबडीचा पाय मलाही आवडतो. पण कधी कधी जाम वैतागतो, अरे ऽ या घरात आम्हाला कुणी वालीच नाही का ?


सफर मंगळावरची । ९५