पान:सफर मंगळावरची.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आयांना खूप आनंद होतो. का कळत नाही पण सारखं हे खा, ते खा असंच आमची आई म्हणते. पण बाबा, सारखं काय रे खात असतोस ? अभ्यासापेक्षा तुझं खाण्याकडेच लक्षं. चल अभ्यासाला बस. आत्ता मात्र आई बाजू घेणार, खाऊ द्या की ओ पोराला खेळून आलंय, भुकेजलंय. बाबा म्हणणार मग कुणी सांगितलं होतं खेळायला, चल लवकर. दोघांची जुंपली. मी आपलं कसंतरी खाणं संपवून अभ्यासाला बसतो. तर कुठला विषय आधी घ्यावा, याचाच निर्णय लागत नाही. लक्ष आईबाबांच्या भांडणाकडे (जीभ चावून) सॉरी मतभेदांकडे. आमच्याकडे भांडणाऐवजी मतभेद होतात. भांडण करायला, आम्ही काय झोपडपट्टीवाले आहोत का? हे बाबांचं मत !
 इंग्रजीचा एखादा अडलेला शब्द बाबांना विचारायला जावं तर, अरे, डिक्शनरीत बघ. डिक्शनरी बघायचा सुद्धा अभ्यास व्हावा लागतो. आणखी चार दोन शब्द नजरेत भरतात. आता इंग्रजी शब्द नजरेत कसे भरतील ? डिक्शनरीत शब्द शोधत बसल्यामुळे बाकीचे विषय बोंबलले. आतून आईचा आवाज, अरे, इंग्रजी झालं असेल तर गणित घे बघू. गणिताकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. भाषा केव्हाही शिकता येतात. गणित मात्र आतापासून पक्के व्हायला पाहिजे. स्वतः मात्र टी. व्ही. पुढे बसणार. वेध काय छान मालिका आहे. त्यातील शिवाजी साटमांची पोलीस निरिक्षकाची दणकट, राकट भूमिका पाहून मलाही पोलीस निरीक्षक व्हावसं वाटतं. पण जरा टी. व्ही. कडं गेलं की, अभ्यास केल्याशिवाय टी. व्ही. पुढे यायचं नाही. अशी तंबी. आम्हाला सांगायचं पोलीस व्हा, पायलट व्हा, कॅप्टन व्हा मग ती माणसं कशी असतात हे तर टी. व्ही. शिवाय कुठं बघायला मिळणार आहेत का ? अशी आदर्श माणसंच बघितली नाहीत तर त्यांच्याप्रमाणे व्हावंसं कसं वाटेल? नुसती गणितं सोडवून दाऊदची टोळी पकडता येते का ? जाऊ द्या झालं. आमचं मत ऐकून घेणारंच कुणी नाही. आम्हा मुलांना वालीच नाही, पालक आहेत पण !

 अभ्यास करून करून परिक्षा द्यावी, सुट्टीत चंगळ करावी, मुबलक खेळावं, पुस्तकाकडे अगदी ढुंकूनसुद्धा बघायचं नाही, असंच मी तर ठरवतो. तर सगळे मित्र सहलीला, कसल्या ना कसल्या शिबिराला नाहीतर आजोळी जातात. खेळायलाच कुणी नसतं. शेवटी गोष्टींच्या पुस्तकाशिवाय कोणी मित्र उरत नाही. पण सारखं वाचायचा पण कंटाळा येतोच की, पुस्तक हा मित्र असला म्हणून

९२ । सफर मंगळावरची