पान:सफर मंगळावरची.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काहीतरी मार्ग दाखवतील. त्यांना या क्षेत्रातील बरीच माहिती असेल. " केट म्हणाली.
 शेवटची आशा म्हणून त्यांनी डॉ. ना पत्र पाठवले.
 बऱ्याच दिवसांनी पत्र आलं म्हणून मावशींनी उत्सुकतेने केटला विचारलं, "कुणाचं गं पत्र ?"
 "डॉक्टरांचं. ते एका शिक्षिकेलाच पाठवतायेत. हेलनला शिकवण्यासाठी. तिचं नाव ॲनी आहे. येत्या शुक्रवारी येईल. आपल्या हेलनला शिस्त लावेल. खरंच का माझी हेलन शहाणी होईल ?"
 केट आनंदाने, थोड्या साशंकतेने मनाशीच बोलल्यासारखी म्हणाली.
 " एवढ्या दिवसात आपल्याला शिस्त लावता आली नाही ती, परक्याची बाई कशी शिस्त लावणार?” मावशी म्हणाली.
 "आंधळ्या, बहिऱ्या मुलांशी कसं वागावं ते शिकलेले असतात ना. बघू शेवटचा प्रयोग, प्रयत्न करून बघायचा, शेवटी देवाची मर्जी.” केट म्हणाली.
 "स्टेशनवर आणायला कुणी जायचं हे ठरवायला पाहिजे." मावशी म्हणाल्या.
 'ॲन सलिव्हान' या टीचरला आणायला हेलनचे वडील गेले. ॲनी टीचर हेलनच्या घरी आली. त्यांच्याच घरी राहून हेलनला शिकवू लागली.
 ॲनी टीचरला, हेलन खूप त्रास द्यायची. कधी कधी तर टीचरला वाटायचं, जावं निघून. पण नंतर वाटायचं आपण गेलो तर हिचं उभं आयुष्य वाया जाईल. आईवडील असेपर्यंत ठीकय. पण त्यांच्या माघारी कोण बघणार हिच्याकडे ? हिचं हिलाच बघता यायला हवं. असा विचार करून पुन्हा नव्याने त्या सुरुवात करत. हेलनला घडवत, शिकवत त्यांनी तिला स्वावलंबी केले. हीच हेलन मोठी झाल्यावर दृष्टिहिनांच्या विश्वातील दीपस्तंभ झाली.
 बाईंची गोष्ट सांगून झाली तरी मुलं शांत, सुन्न होती. भारावून गेली होती. आता प्रत्येकानं हेलनचं पूर्ण चरित्र वाचून काढायचं असंच ठरवलं.

***
९०३ । सफर मंगळावरची