पान:सफर मंगळावरची.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " मार्था का गं रडतेस ?"
 "हेलनने माझे केस कापले. " मार्था स्फुंदत म्हणाली.
 "आता काय करावं या मूर्ख मुलीला मार्था उगी उगी. अगं, हेलन वेडीच आहे. आता तिला मी चांगली शिक्षा करते. तुम्ही मुलं तिच्याशी एवढं खेळता तर ती तुम्हालाच त्रास देते. ती काय करते हे तिलाच कळत नाही बेटा. तू जा घरी. पर्सी हिला तिच्या घरी ने रे. रडू नकोस, बेटा."
 पर्सी मार्थाला घरी नेतो. केटने हेलनला ओढतच घरात नेले.
 " उच्छाद मांडलाय नुसता पोरीनं.” तिनं तिच्या पाठीत धपाटा घातला.
 "अगं अगं का मारलंस? तिला काहीतरी कळतं का ? मारून काही उपयोग आहे का ?"
 म्हाताऱ्या मावशी हेलनला जवळ घेत म्हणाल्या,
 "हेलन, बघ मी तुझ्यासाठी बाहुली केलीय. "
 जुन्या कापडाची ओबडधोबड शिवून, कापूस भरलेली बाहुली, मावशी हेलनच्या हातात देतात. हेलन ती बाहुली हातात घेऊन गंभीरपणे तिचे सगळे अंग चाचपते. तिचा हात चेहऱ्याकडे जातो, तिथे डोळेच नसतात. नुसतंच गोल गोल गाठोड्यासारखं. नाक, ओठ, कान काहीच नसते. तिच्या मावशीला वाटतं आंधळीला काय काहीही खेळायला दिलं तरी चालतं. पण हेलनची बोटं सगळं पाहात असतात. तिला जाणवतं बाहुलीला चेहराच नाही. एवढीशी पोर पण किती डोकं तिला, ती उठते, मावशीची सुईदोरा, बटणाची बास्केट ओढते. त्यातील दोन बटणे घेते अन् बाहुलीच्या चेहऱ्यावर जोरात दाबते. तिची कृती केट पाहाते. तिचे हात हातात घेऊन बटणे आपल्या डोळ्याकडे नेते, तेव्हा हेलन उत्साहाने मान हलविते. जणू तिला म्हणायचे असते, बाहुलीला डोळे का नाही लावले? डोळ्यांशिवाय बाहुली कशी चांगली दिसेल ? हेलनच्या आईने केटने दोन टाचण्या घेऊन बटणे चेहऱ्यावर लावली. केटचे डोळे भरून आले. ती म्हणाली,
 "अगं हेलन, तू जगतेस डोळ्यांशिवाय, बाहुलीला मात्र डोळे हवेत म्हणून हट्ट. तुला जे कळंतय ते देवाला कसं कळलं नाही गं?"

 हेलनला, बाहुलीला डोळे आले म्हणून केवढा आनंद झाला. ती बाहुलीची पापी घेते, डोलावते, जोराजोरात थोपटते. आता ती बाळाला पाळण्यातसुद्धा झोपवणार असते. हेलन चाचपडत पाळण्याकडे जाऊ लागते. पाळण्यात छोटं

८८ । सफर मंगळावरची