पान:सफर मंगळावरची.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बसवायचे नाही. काहीच समजत नसल्यामुळे ती खूप चिडायची, संतापायची. हाताला लागतील त्या वस्तू फेकायची. तिला शिस्त कशी लावायची तेच घरातल्यांना कळत नव्हतं. मनाला येईल तसं तिचं वागणं, अगदी जनावरासारखंच म्हणा ना. हेलन मोठी होत होती. तिची बुद्धी चांगली पण तिला आकार नव्हता, विचार नव्हता, संस्कार नव्हता. नुसता डोंगराच्या कड्यावरून कोसळणारा धबधबाच जणू. तिचं करता करता घरातले अगदी नाकीनऊ आले होते. मैत्रिणींना तिचा त्रास व्हायचा. एकदा तिची मैत्रीण व मित्र मार्था आणि पर्सी बागेत कातरीने कागद कापून फुले, बाहुल्या वगैरे करत बसले होते. हेलन आता सहा वर्षाची झालेली. तिचा आडदांडपणाही तेवढाच वाढलेला. तिची हालचाल भरभर, विचित्र, असंस्कृत असायची. तिचा मित्र पर्सी तिच्या या वेडगळपणाला सारखा हसायचा. हेलनला त्याचं वागणं जाणून घ्यायचं असायचं म्हणून ती पर्सीचा चेहरा चाचपायची, ओठापर्यंत हात न्यायची. पर्सी गमतीने तिचे बोट चावायचा. पटकन ती बोट मागे घ्यायची. स्वत:च्या चेहऱ्यावर हात फिरवायची. ओठाजवळ न्यायची, पर्सीप्रमाणे तिलाही हसायचे असते. ती तसा प्रयत्न करते पण तिला जमत नाही. ती बोलायला बघते, तिचे ओठ थरथरतात पण तिला तेही जमत नाही. म्हणून पर्सी हसतो. मग ती संतापते. मार्था पर्सीला म्हणते,
 "हसू नको रे, ती रागावलीय. "
 "अगं ती वेडीच आहे. तिला काय हसलं रडलं कळतंय ?"
 हेलन जमीन चाचपते, हाताने चाचपडते हीच तिची भाषा असते. मार्थाचे लक्ष जाते. ती म्हणते.
 "अरे, तिला काय तरी हवंय. "
 ती दोघं तिच्या हालचालीकडे पहातात. कातरीसारखे हावभाव पाहून पर्सी म्हणतो,
 "अगं ती कातरी शोधतेय. "
 "ही घे हेलन. "
 मार्था तिच्या हातात कातरी देते तर हेलन पटकन तिचे केस पकडून एक बट कापते. मार्था आरडाओरडा करते. पर्सी तिला समजावतो.
 "जाऊ दे गं, वेडीच आहे. तिला काय कळत नाही. "
 "आता मला सगळे चिडवतील, आई पण रागावेल." मार्था रडू लागली.

 मुलांचा गोंधळ ऐकून हेलनची आई बाहेर आली. मार्थाकडे पाहून म्हणाली.

सफर मंगळावरची । ८७