पान:सफर मंगळावरची.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाळ हेलन


 इयत्ता पाचवीचा वर्ग. परीट सर इंग्रजीचा तास घेऊन गेले. लगेच मुलांचं सैलावून किलबिल सुरू झालं. दुसरे भूगोलाचे पाटील सर येईपर्यंत गलका वाढला. बराच वेळ झाला तरी सर अजून येत नाहीत म्हणजे रजेवर आहेत की काय? मुलं अंदाज करू लागली. तेवढ्यात पवारबाई आलेल्या मुलांनी बघितलं. मुलं मनातून आंनदली. कारण पवारबाई मराठी फारच छान शिकवायच्या. कविता शिकवताना पाठसुद्धा व्हायची. इतकी चांगली समजायची. अधूनमधून गोष्टीही सांगत. आज तर बाईंचा तास नाही तरी आल्या, म्हणजे गोष्ट ऐकायला मिळणार. टेबलाजवळ उभ्या राहात बाई म्हणाल्या,
 "आता कुणाचा तास आहे ?"
 " भूगोलाच्या पाटील सरांचा." मुले एका सुरात ओरडली.
 " पाटील सर रजेवर आहेत. मी भूगोल शिकवलं तर चालेल का ?"
 पुढच्या मुलाच्या बेंचजवळ येऊन भूगोलाचे पुस्तक हातात घेत बाई म्हणाल्या. मुलं हिरमुसली. त्यांना वाटलं बाई गोष्ट वगैरे सांगतील. धिटुकला सौरभ म्हणाला,
 "बाई गोष्ट सांगा की,"
 " हो बाई गोष्टच सांगा, तुम्ही किती छान गोष्टी सांगता. "
 बाईंना, आपण सांगितलेली गोष्ट मुलांना आवडते म्हणून बरं वाटलं. त्या म्हणाल्या,
 “बरं, शांत बसा, रात्री आम्ही एक नाटक पाहिलं. त्याची सांगू का गोष्ट ?"
 " हो ss" मुलं सावरून बसली.
 "कुठलं नाटक ?" ज्योतीनं विचारलं.
 " किमयागार." बाई खुर्चीत बसल्या.
 "हेलन केलर ही आंधळी आणि बहिरी महिला तिच्यावर होतं. सांगू का ?"
 "हो ऽ " मुलं हरखली. एका सुरात ओरडली.

 " ठीकेय. तर ऐका. ऑर्थर केलर आणि केट केलर ह्यांची हेलन ही मुलगी. तिच्या आधीचा तिला एक भाऊ होता. त्याचं नाव जेम्स. दुसरी हेलन. हेलनपेक्षा

८४। सफर मंगळावरची