पान:सफर मंगळावरची.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेळ वाचायचा. तर डिंपी हमखास पेपरवर येऊन बसायची. कापडावर पेंटींग किंवा भरतकाम करताना ते कापड पसरलेलं असेल तर ती समोर कापडावर येऊन आराम करायची किंवा डुलक्या काढायची. टी. व्ही. बघताना ती टी. व्ही. वरच जाऊन बसायची. माझ्याकडे बघायचं सोडून दुसरीकडं कशाला आणि काय बघता? असंच तर तिला म्हणायचं नसेल ना? आम्ही जेवताना मात्र ती फारशी रेंगाळायची नाही. थोडासा दूधभात खायची, बस. मटणाचा वास मात्र तिला स्वस्थ बसू देत नव्हता. तेव्हा डिंपी फार फार वाईट व्हायची. भरपूर मार खायची. मटण आणल्यापासून तिचं म्याँव म्याँव सुरू व्हायचं. कितीही दिलं तरी गट्टम करून टाकायची. एवढासा जीव पण किती खावं मटण, त्याला काही प्रमाण ? एकावेळी पाव, अर्धा किलो खात असेल. तिच्या पोटाची भीती वाटायची. एरवी थोडासा दूधभात खाणारी डिंपी मटण आणल्यावर इतकी घाण का वागते, काय कळायचं नाही. अगदी घरात मटण आणणं, शिजवणं नको वाटायचं.
 डिंपी आता मोठी, समंजस झाली होती. आम्ही परगावी गेल्यावर घर बंद असले तरी उघडल्यावर ती यायचीच. आता ती आमच्याशिवाय राहाणार नाही. आम्हाला कुठे सोडून जाणार नाही, असंच वाटू लागलेलं. एकदा उन्हाळ्यातच दोन दिवस आम्ही सर्वजण गावाला गेलो होतो. नेहमीप्रमाणे खिडक्यांच्या गैरसोयीमुळे डिपीला बाहेरच ठेवलेलं. आम्ही गावावरून आलो तरी ती आलीच नाही. एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस.... किती वाट बघितली. कुठलं मांजर बघितलं की, डिंपी 5 असं नकळत तोंडातून बाहेर पडायचं. डिंपी पुन्हा कधीच दिसली नाही. आम्ही तिला सोडून गावाला गेलो म्हणून ती रागावली आमच्यावर. रूसून गेली. स्वप्नालीची तगमग बघवत नाही. ओरडून विचारावं वाटतं, 'डिपे, तू कुठे असशील तिथून लगेच निघून ये. आम्ही तुझी खूप वाट पहातोय. तुझी आई झालेल्या स्वप्नालीसाठी तरी ये. डिंपे, कुठं गेलं तरी डोळे तुलाच शोधतात... कुठं आहे ? कशी आहेस तू... ?
 असं वाटतं सर्वांना विचारावं, टी. व्ही. रेडिओ, वर्तमानपत्र, सगळीकडं कळवावं, जाहिरात द्यावी,
 'पाहिलंत का कुणी आमच्या डिंपीला ?'

***
सफर मंगळावरची । ८३