पान:सफर मंगळावरची.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कोल्हापूरला येताना प्रवासात डिंपी सतत बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करायची. तिला नुसतं धरूनच नव्हे तर, घट्ट धरून ठेवावं लागे. ती उडी मारून जाईल कुठेतरी म्हणून नुसतं स्वप्नाली तिला घट्ट धरून बसायची. दुसऱ्या कुणाकडे द्यायलाच तयार नव्हती. डिंपी फक्त तिच्याच जवळ सुरक्षित राहू शकते. तिचा कुणावर भरवसाच नव्हता. तिला धरून ठेवणे हेच तिच्यासाठी महत्त्वाचं काम होतं. त्यासाठी ती उपाशी राहिली. पण तिला अजिबात बाजूला होऊ दिलं नाही. खाण्याच्या नादात ती टुणकन उडी मारायची अन् जायची कुठं.... ही कल्पनासुद्धा तिला सहन होणारी नव्हती. आई लेकराचा जसा त्रास काढती तसाच त्रास स्वप्नालीने डिपीचा काढला.

 कोल्हापूरात सगळंच नवीन. इथे घराच्या खिडक्यांना डास येऊ नयेत म्हणून बारीक जाळी बसवलेली. त्यामुळे रात्रीचे दार बंद असल्यावर डिपीची फारच गैरसोय होऊ लागली. तिला हवं तेव्हा बाहेर जाणं, हवं तेव्हा आत येणं जमेना. अगदीच रस्त्यावर घर असल्यामुळे दरवाजा उघडा ठेवणंही सारखं शक्य नव्हतं. बाहेर जायचं असलं की ती दाराजवळ घुटमळायची, किंवा दारावर नख्यांनी ओरबाडायची. मग कुणीही हे लक्षात आल्यावर तिला बाहेर सोडायचं. रात्री मात्र ती स्वप्नालीच्या ताब्यात असायची. तिचं खाणं, पिणं, झोपणं सगळं स्वप्नालीच्या सोबतीनं, संगतीनं असायचं. सगळे झोपलेले असले की डिंपीला बाहेर जायची हुक्की यायची. मग स्वप्नाली तिला बाहेर सोडायची. डिंपीचं हिंडणंफिरणं, शी-शू झालं की यायची. तिचा आवाज आला की आधी स्वप्नाली जागी व्हायची अन् तिला आत घ्यायची. मग डिपी स्वप्नालीच्या कुशीत झोपायची. रात्रीतून हे बऱ्याच वेळा व्हायचं. स्वप्नाली हा सगळा त्रास काढायची. त्यामुळे मी बिनघोरी असायची. मी स्वप्नालीला किती वेळा ओरडले, डिपीला फार तोंडाजवळ घेत जाऊ नकोस. कुत्र्यामांजराचे केस तोंडात गेल्यावर अस्थमा होतो. असं कुठं वाचलेलं, ऐकलेलं, त्यामुळे मला ताण यायचा, काळजी वाटायची. तिनं डिंपीला पायाशी झोपवावं, पण नाही, डिंपी हक्काने तिच्या कुशीतच झोपायची. स्वप्नाली शाळेत गेली की डिंपी तिच्या चादरीवरच बसायची, झोपायची. ती कान्हाच्या चादरीवर किंवा दिवाणवर बसायची, झोपायची नाही. माझ्याजवळही कधी झोपायची नाही. मी चहा पिताना किंवा हाताने बसून काम करताना वर्तमानपत्र जमिनीवर पसरून वाचते. त्यामुळे हाताने काम चालू म्हणजे भाजी निवडणं, चहा पिणं वगैरे तर डोळ्यांनी पेपर वाचणंही व्हायचं. एकावेळी दोन कामं केल्यामुळं

८२ । सफर मंगळावरची