पान:सफर मंगळावरची.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घरी परतलो तर दोन्ही पिल्लांना बोक्याने नुकतेच मारलेले. डिंपी फिस्कारून बोक्यावर धावून जात होती. पण बोक्याची शक्ती जास्त, डिंपी लहानखुरी नाजूक, तरी जोराजोरात ओरडत बोक्याच्या अंगावर जात होती. पण सगळे संपले होते. डिंपीने ओरडून घर डोक्यावर घेतले. खरे तर असे शत्रू दिसले की डिंपी रूद्रावतार घेऊन पिल्लांचे संरक्षण करी. पण बाहेर गेल्यानंतर, आम्हीही घरात नव्हतो तेव्हाच वैऱ्याने डाव साधला. खूप हळहळ वाटली. स्वत: ची गाडी नसल्यामुळे तिला कुठे बरोबर नेणंही शक्य नव्हतं. सगळे सुन्न झाले. स्वप्नाली तिला जवळ घ्यायचा प्रयत्न करायची पण ती जवळ यायचीच नाही. दुःखाने ओरडत घरभर पिल्लांना शोधत फिरायची. बिचारी डिंपी थोडे दिवस ओरडून शांत झाली. तिसऱ्यांदा मात्र तिने उंच माळ्यावर जागा शोधली. आता तिकडं कोणी जाऊ शकणार नाही, असं डिपीला वाटलं असावं. माळ्यावर कुकरचं खोकं होतं, त्यात तिनं बाळ ठेवलं. ती घरात नसताना स्वप्नालीनं खोक्यात मऊ अंथरूण घातलं. तिचं चिमखडं पिल्लू बघायला मुलं खोकं सारखं खाली काढून घेत. ती यायच्या आत खोकं वर ठेवत. पण ते तिच्या लक्षात आलं असावं. तिला ते आवडलं नसावं. तिनं मग ते पिल्लू बाहेर नेलं. कधी नेलं, कुठं नेलं काहीच कळलं नाही. मनात नाना शंकाकुशंका. डिंपी पिल्लू खाल्लं तर नसेल. मुलांची आजी म्हणाली, मांजर स्वतःचं पिल्लू खातं. ही नवीन माहिती ऐकून आम्ही तर हबकलोच. बोक्यानं मारलेल्या पिल्लांचं तिनं काय केलं होतं, हे कुणालाच ठाऊक नव्हतं. पण डिंपी पिल्लू खाईल असं कुणालाच वाटलं नाही. मग पिल्लाचं काय झालं? पिल्लू दूध प्यायलं नाही तर स्तनं सुजतात. पण डिपीचं तसंही काही नव्हतं. डिंपी सहज वावरत होती. शेजारीपाजारी चौकशी केली, शक्य होईल तिथं पिल्लांचा शोध घेतला, पण पत्ताच नाही. तिला रागावायला लागलं की, कावरीबावरी होऊन बघायची. जणू तिला सांगायचं होतं की, माझं बाळ सुरक्षित आहे. आमची तगमग चाललेली. चारपाच दिवस असेच गेले. आणि एके दिवशी ती पिल्लू घेऊन आली. आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला. अगदी हायसं वाटलं. ते पिल्लू एकजणानं मागितल्यावर मात्र मुलं नको म्हणत असतानाही देऊन टाकलं. कोल्हापूरला बदली झाल्याचं कळलं होतं. कुठेतरी पिल्लू सुरक्षित राहिलं म्हणजे बास. आता ती आमच्याकडे संशयाने बघायची, ओरडायची. तिची तगमग चाललेली.. पण नंतर तिला पिल्लू सापडलं असावं. ती शांत झाली.

सफर मंगळावरची । ८१