पान:सफर मंगळावरची.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेव्हा डिपीला अजिबात एकटं सोडायला स्वप्नाली तयार नव्हती. ती आमच्याबरोबर आलीच नाही. मग शेजारच्या मुलींना रात्री तिच्या सोबत झोपायला सांगून आम्ही गेलो. डिंपीची न् स्वप्नालीची चांगलीच जोडी जमली होती. स्वप्नाली तिची सतत काळजी घ्यायची डिंपीही तिच्याशिवाय राहायची नाही. ती शाळेत गेल्यावर मात्र गावभर भटकायची. हल्ली रात्रीही बराच वेळ बाहेरच असायची.
 डिंपी आता मोठी होत होती. तिचं बाहेर भटकणं वाढलं होतं. तिला एकटीला ठेवून गावाला तीनचार दिवस गेले तरी चालायचे. तिच्यासाठी घरात थोडा दूधभात वगैरे ठेवायचा. सरकारी बंगला, जुन्या पद्धतीचा. खिडकीला वरती झडप होती. ती उघडी ठेवली की त्यातून तिचं आतबाहेर चालायचं. गावावरून आल्यावर मात्र म्याँव, म्याँव करत स्वप्नालीच्या मागे फिरायची. तिचं आर्तपणे ओरडणं पाहून पोटात कालवायचं. 'मला का ठेवून गेलीस?' असंच जणू तिला विचारायचे असायचे.
 डिपीला बाळ झाल्यावर स्वप्नालीच्या अन् कान्हाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तिचे चिमुकले बाळ पहायला मुलं सारखी जायची. म्हणून मग डिपीही सतत जागा बदलत रहायची. ती पिल्लाला फार जपायची. स्वप्नाली तिची एवढी जिवाभावाची पण तिलासुद्धा पंजा मारायची. कान्हाला तर जवळसुद्धा येऊ द्यायची नाही. तो जवळ येतोय असं लक्षात आलं की जोरात फिस्कारायची. कुठल्याही प्राणीजातीत मादी आई झाली की पिल्लाच्या रक्षणासाठी खूपच आक्रमक होते. हिंसक होते.
 एकदा आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला गेलो होतो. बाबा एकटेच घरात होते. ते दिवसभर कामाला गेले की घरात कोणीच नाही. डिंपीही अन्नाच्या शोधात बाहेर गेली असेल. तेव्हाच बोक्याने बहुतेक तिचं पिल्लू खाल्लं असावं. बाबा रात्री घरी आल्यावर डिंपीने ओरडून आकांत केला. पण इलाज नव्हता. तिच्या पिल्लासाठी कुणीच काय करू शकत नव्हते...!
 दुसऱ्यांदा पिल्लू व्हायच्या वेळेस घरभर डिंपी चांगली जागा शोधत होती. स्वप्नालीने तिच्याच दिवाणमध्ये जागा करून दिली. जुनी चादर अंथरून मऊ मऊ जागा तयार केली. दोन पिल्लं झाली. पिल्लांनी कपडे घाण केले तर स्वप्नाली स्वतः धुवायची. तिला अजिबात घाण वाटत नव्हतं. मी किरकिर करायची म्हणून गुपचीप हे काम ती करायची.

एवढी काळजी घेतली पण यावेळीही घात झालाच. एका लग्नावरून उशीरा

८० । सफर मंगळावरची