पान:सफर मंगळावरची.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डिंपी


 डिंपी आमची डिपी. तिची आठवण आली की, डोळे भरून येतात. होतीच तशी गुणाची. डिंपी म्हणजे आमचं मांजर. पलुसहून सोलापूरला बाबांची बदली झाली, तेव्हा शेजारच्या नवलेबाईंनी एक सुंदर. छोटसं अगदी तीन आठवड्याचं पिल्लू आम्हाला दिलं. नवीन शहर, परिसर, घर, माणसं सगळंच नवीन ओळखीचं कोणीच नाही. अशावेळी करमत नाही. पण डिंपीनं ती उणीव भरून काढली. अतिशय शांत. कसलाच त्रास नाही. खाणंही कमी. मुलांशी मात्र मनोसोक खेळायची. थोडी मोठी झाल्यामुळे लांबवर फिरायला जायची. तेव्हा आमचा जीव खालीवर व्हायचा. एकदा डिंपी रात्रभर घरी आलीच नाही. त्यावेळी स्वप्नालीनं गोंधळ घातला. जेवली नाही. कान्हाने देवाला प्रार्थना केली. स्वप्नालीला चैन पडत नव्हतं. सैरभैर झालेली. काय करावं काही सुचेना. तिला सारखं रडू येत होतं. कान्हा म्हणाला.
 "मी देवाची प्रार्थना केलीय. नक्की येईल डिंपी ."
 त्याचं ऐकून स्वप्ना देवाला नवसच बोलली,
 "डिपी सापडू दे, पेढे वाटीन."
 देवाला प्रार्थना केली, नवस बोलून झाला. शोध तर आपल्यालाच घ्यावा लागेल. देव काय सांगणार नाही, अमुक ठिकाणी डिंपी आहे.... वगैरे. खूप शोधलं. ओळखीचे, बिनओळखीचे, अशा कुणाच्याही घरात जाऊन विचारायचं आमचं मांजर आलंय का ? गल्ली, बोळं, अंधारातल्या जागा, फटी, सापटी असं रात्री खूप उशीरापर्यंत शोधाशोध केल्यानंतर एकदाची डिंपी सापडली. तिची अवस्था फारच दयनीय झाली होती. तिचं अंग घाण झालेले, दिवसभर उपाशीच असावी, कारण तिचं पोट भकाळी गेलं होतं. ती बेचैन होऊन ओरडत होती. त्यामुळे वाईट वाटले पण एकदाची आपली डिंपी मिळाली म्हणून खूपच आनंद झाला. मुलांनी देवापुढे पेढे ठेवले.

 त्या अनुभवामुळे की काय पण डिपी आता एकटी राहायची नाही. ती तशी फार मोठी झाली नव्हती. एकदा आम्हाला गावाकडे जाणं आवश्यकच होतं.

सफर मंगळावरची । ७९