पान:सफर मंगळावरची.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काही बोललं नाही. सकाळी न्याहरी केली की मुलं रानात निघाली. आंबे केसरी, पिवळे होऊ लागलेले. मिलूला सांगितले, तू लक्ष ठेव आजीकडं, आजी आली की लगेच, या ऽ हूँ ऽ करून ओरडायचं. तिघे झाडावर चढले. आजीबरोबर ज्योती, प्राची रानात आल्या. रानात आल्याबरोबर आजीनं अंगणात तळवटावर ज्वारी वाळत टाकली. प्राची, ज्योती, ज्वारी पसरून झाली की आजीला विचारून बागेत गेल्या. प्राचीला यातलं काहीच माहीत नव्हतं. झाडावर चढण्याच्या गोष्टीबद्दल आजीला कळू द्यायचं नव्हतं म्हणून तिलाही कुणी काही सांगितलं नव्हतं. प्राचीनं झाडावर चढलेली मुलं बघितली अन् ती घाबरलीच. आजी कुणाला झाडावर चढू देत नाही हे तिला आठवलं. ती तशीच मागे फिरली. ज्योती झाडाकडे जाऊन, "आंबे खाली टाका." असं वरच्या मुलांना सांगत होती. ते काही टाकेनात. मग ज्योती वर चढू लागली. प्राची आजीकडं गेली. आजी ज्वारीला हात देत होती. प्राची धापा टाकत आजीला सांगू लागली.
 "श्रीदादा, जयूभैय्या, कुलदीप झाडावर चढलेत."
 थोडावेळ आजीला काहीच सुचेना. मग उठली न् बागेकडं पळतच सुटली. तिच्यामागे आजोबा. ते का पळताहेत म्हणून बबन. आप्पाही पळत निघाले. जिजी, माई, बाई चालत बागेत निघाल्या. मुलं झाडावर चढलेली पाहून आजीच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. एवढा सगळा घोळका पाहून मिलू, पोरांना सावध करायचं सोडून आजीकडेच पहात बसला. जाडजूड, पदर सावरीत पळणारी आजी पाहून त्याला हसू येत होतं. आता आजी ओरडणार म्हणून भितिही वाटत होती. मुलांनी झाडावरून सगळ्यांना बघितलं. मुलं घाबरली. आजोबा बबनला ओरडून म्हणाले.
 "उतरव त्यांना खाली."
 "आम्हाला येतं उतरायला." असं म्हणत मुलं उतरू लागली.
 खाली उतरल्याबरोबर मुलांनी आजीला मिठी मारली. आजी भानावर येऊन मटकन खालीच बसली आणि मुलांना जवळ घेऊन कुरवाळू लागली. बबनने आंबे, कैन्य गोळा करून घरात नेऊन ठेवल्या. जिजी म्हणाली,
 "आता रोज जेवताना ताज्या कैऱ्या खायला मिळतील."
 आजीच्या डोळ्यात अश्रुबरोबर कौतुकही ओसंडून वहात होते.

***
७८ । सफर मंगळावरची