पान:सफर मंगळावरची.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चिंचोके टाकायचे. तिचा चिडलेला चेहरा पाहून लय मजा इल.
 बबनचं शेण काढून झालं. गोठा झाडला. गुरांना फिरवून आणलं. बांधावरच्या बाभळीखाली गुरं बांधली. वैरण कापून घातली. शेरडांना शेवरीच्या झाडाच्या फांद्या तोडून त्याचा पाला खायला घातला. एवढी सगळी कामं झाल्यावर बबन मुलांना म्हणाला,
 "चला रं पोरांनो, कोण कोण येतय ?"
 जयू मिलू तयारच होते. श्री पळत आला. रोहित बबनच्या पुढे निघाला. कुलदीप आधीच झाडाखाली जाऊन उभा राहिलेला. त्याने वर चढायचा प्रयत्नही केलेला. पण जमतच नव्हतं. तो बबनला म्हणाला,
 "मी पहिल्यांदा आलोय म्हणून मीच आधी झाडावर चढणार."
 "बर चला." असं म्हणून बबन कुलदीपला कसं चढायचं ते सांगू लागला.
 "खाचेत पाय ठेवायचा, अन् खरबुड्या टेकणावर हाताने घट्ट धरायचे. मग पायाला रेटा द्यायचा अन् हळूच वर सरकत चढायचं. किती सोप्पंय? एका दिवसात न्हाय राव जमणार. रोज सराव कराया होवं. "
 कुलदीप चढला पायाला रेटा देऊन वर सरकला पण पाय ठेवायला जागाच सापडेना. तेव्हा ओरडला.
 "आता पाय कुठं ठेवू?"
 “पायानंच जागा हुडकायची असती." असं म्हणत बबनने कमरेला हात देऊन जरा वर रेटलं. आंब्याचं झाड फार उंच नव्हतं एकेकाला वर चढवलं. श्री तर पटकन चढला. ज्योती सुरूसुरू खारोटीसारखी चढली. वरती जाऊन कैरी खात बसली. असं करता करता एक दोन प्रयत्नात मुलं झाडावर चढू लागली. आजी नसल्यामुळं आई, काकी, बाई, जिजी, माई दुपारचं जेवण घेऊन रानात आलेल्या. पोरांना झाडावर चढलेलं बघून, पडतील काय म्हणून त्यांना भीती वाटली, आणि कौतुकही.
 "अरे, भूकबिक लागतीय का न्हाय, चला जेवायला.” जिजी ओरडली.
 "माझ्यासाठी गाभाळलेली कैरी आण." माई मिलूला म्हणाली.
 "आज काय गुरांला सोडायचं न्हाय का ? नुसतं खेळतच बसाणारेयस का पोरांच्यात ?"

 आजोबा बबनवर खेकसले. बबन गपचीप गुरांकडं गेला. मुलं पळाली. चार दिवसांनी आजी आली. झाडावर चढण्याच्या गोष्टीबद्दल आजीला कुणी

सफर मंगळावरची । ७७